Tender Tendernama
पुणे

Pune: अवघ्या काही तासांत 97 कोटींच्या टेंडरला पीएमसीची मान्यता; खरे कारण नेमके काय?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेत (PMC) एखाद्या फाइलवर अनेक दिवस काहीच कार्यवाही होत नाही. प्रस्ताव योग्य असला तरी त्यावर निर्णय लवकर घेतला जात नाही. मात्र शुक्रवारी (ता. १३) घनकचरा व्यवस्थापन विभागातील जैविक उत्खननाच्या (बायोमायनिंग) टेंडरचा (Tender) प्रशासकीय कार्यतत्परतेमुळे प्रवास सुसाट झाला.

बायोमायनिंगचे टेंडर स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी सादर करण्यासाठी सहा विभागांमध्ये अवघ्या काही तासांत फाइल फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे. या टेंडरमध्ये वाहतूक खर्च (टिपिंग फी) प्रतिटन १३५ रुपये जादा दराने आला होता. तडजोडीअंती ठेकेदाराने अवघ्या नऊ रुपयांनी दर कमी केला. त्यामुळे ९७ कोटींचे टेंडर स्थायी समितीने मान्य केले.

महापालिकेने राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोतील १० लाख मेट्रिक टन कचऱ्याच्या बायोमायनिंगसाठी टेंडर काढले आहे. यामध्ये दोन लाख टन ‘आरडीएफ’वर प्रक्रिया केल्याच्या अनुभवाची अट अनिवार्य केल्याने आर्थिक क्षमता असूनही अनेक कंपन्या अपात्र ठरल्या. तर अवघे दोन ठेकेदार पात्र ठरले.

यामध्ये भूमी ग्रीन एनर्जी कंपनीने सर्वांत कमी दराची प्रति टन ९७९ रुपयांनी टेंडर भरले. महापालिकेने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा हा दर प्रति टन १३५ रुपयांनी जास्त असल्याने महापालिकेचे थेट १३ कोटी ५० लाखांचे नुकसान होणार असल्याचे समोर आले. त्यामुळे घनकचरा विभागाने या कंपनीला टेंडरमधील दराचे पृथक्करण सादर करावे आणि दर कमी करण्याबाबत सात दिवसांत कळवावे, असे पत्र महापालिकेने दिले आहे.

त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर ठेकेदाराने केवळ नऊ रुपये कमी करून ९७० रुपये प्रतिटन दर दिला. तो प्रशासनाने मान्य केला. त्यामुळे महापालिकेचे १२.६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सकाळी महापालिकेत चक्र फिरण्यास सुरुवात झाली. बायोमायनिंगचे टेंडर स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविण्यासाठी प्रस्ताव तयार केला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रस्ताव लेखा व वित्त विभागाकडे गेला. तेथून तो अवघ्या काही वेळात दक्षता विभागात फाइल तपासणीसाठी गेली.

तेथून सकारात्मक शेरा आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त, आयुक्तांच्या मंजुरीनंतर प्रस्ताव नगरसचिव विभागात आयत्यावेळी दाखल झाला. त्यास दुपारी चारच्या सुमारास स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली. मात्र या सहा विभागांत प्रवास होताना एका महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख महापालिकेत उपस्थित नसतानाही त्यांच्या स्वाक्षरीशिवाय फाइल पुढच्या विभागात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बायोमायनिंगच्या टेंडरमध्ये ठेकेदाराने वाहतूक शुल्क नऊ रुपयांनी कमी केले असून, टेंडरला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या प्रस्तावावर सर्व विभागप्रमुखांनी स्वाक्षरी केली आहे.

- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका