पुणे (Pune) : किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील खड्डे व धुळीतून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. महापालिकेच्या पथ विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविले होते. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्यावर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले असून, मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोटही उडत आहेत.
नांदोशी रस्त्यावर किरकटवाडी हद्दीत दिवसभरात मोठ्या संख्येने अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या पथ विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले व रस्ता दुरुस्त केला होता. परंतु त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत.
खडी क्रशची वाहतूक करणाऱ्या डंपरची रस्त्याने सतत ये-जा असल्याने रस्त्यावर खडी, सिमेंट व वाळूही मोठ्या प्रमाणात सांडत आहे. जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था होऊन मार्गावरील धुळीचा त्रास वाहनचालकांना होत आहे. सध्या उन्हाचा तडाका वाढला असून हे सिमेंट व माती हवेत पसरत आहे.
या धुळीने पादचाऱ्यांनाही हैराण केले आहे. तसेच वाहनचालकांसह लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून मास्कशिवाय प्रवास करणे अशक्य झाले आहे.
या धुळीमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, घसा बसणे असे त्रास सुरू झाले आहेत. तर काहींना त्वचेचे विकारदेखील जडत आहेत. सातत्याने धुळीतून प्रवास करावा लागत असल्याने हे विषाणूजन्य आजार बरे तरे कसे होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष द्यावे व या समस्येवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशा मागणी होत आहे.
रस्त्यालगत असलेल्या गृहसंकुलातील नागरिक, दुकानदार यांच्याही घरात व दुकानात दररोज मातीचा थर जमा होत आहे. यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहे. महापालिका प्रशासनाने तत्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवून ही धूळ साफ करणे गरजेचे आहे.
- राम हगवणे, रहिवासी, किरकटवाडी
या रस्त्यावरील असणारे खड्डे आमच्या विभागाकडून बुजविण्यात आले होते. परंतु आता पुन्हा रस्त्याची पाहणी करून तत्काळ खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल.
- नरेश रायकर, उपअभियंता, पथ विभाग