पुणे (Pune) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) माध्यमातून झालेल्या विकास कामांचे ऑडिट करणार, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले होते. बैठक घेऊन आठ दिवस उलटले असून, पवार आता काय भूमिका घेणार, खरेच ऑडिट करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) शहर पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांतील विकास कामांची चौकशी करण्याचा इशाराही पवार यांनी दिला होता.
पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला. २००२ पासून २०१७ पर्यंत महापालिकेवर पक्षाची एकहाती सत्ता होती. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात झालेल्या कामांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतले होते.
दोन जुलै रोजी पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह समर्थक आमदार भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर साधारण दीड महिन्याने २४ ऑगस्ट रोजी पवार महापालिकेत आले. अधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीत त्यांनी कामांचा आढावा घेतला. विकासकामांबाबत केलेल्या आरोपांची चौकशी करून ऑडिट करण्याचा इशारा दिला आहे. खरेच ऑडिट होणार का? पवार काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
साप्ताहिक आढावा बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात बैठक घेऊन पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेसह जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतात. शिवाय, पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात त्यांचे खासगी सचिव दर सोमवारी नागरिकांच्या तक्रारी व सूचनांचे निवेदन स्वीकारत असतात.
राष्ट्रवादीच्या ‘हिटलिस्ट’वरील प्रकरणे
- मोशी डेपोतील कचऱ्याचे ‘बायोमायनिंग’ व लागलेली आग
- यांत्रिक पद्धतीने रस्तेसफाई
- मोशी-चऱ्होली-लोहगाव जोडणारा ९० मीटर रस्ता निर्मिती
- मामुर्डी-वाकडपर्यंत बंगळूर महामार्गाच्या सेवा रस्त्याची स्थिती
- अर्बन स्ट्रीट डिझाईन योजनेतील रस्ते, पदपथांची स्थिती
- निगडी-रावेत बीआरटी मार्गावरील उड्डाणपुलाचे काम
- शहराला दिवसाआड व २४ तास पाणीपुरवठा
- भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाच्या जॅकवेलचे काम
- पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्पांची स्थिती
- मोशी येथे प्रस्तावित रुग्णालयासाठीची टेंडर प्रक्रिया
- विविध कामांसाठीच्या टेंडर प्रक्रिया
- टेल्को रस्ता रुंदीकरण टेंडर प्रक्रिया
- कोरोना प्रतिबंधक औषधे व वैद्यकीय उपकरणे खरेदी
- कोरोना काळातील कोविड केअर सेंटरची उभारणी