PMC Tendernama
पुणे

Pune : अधिकारी दाखवताहेत ठेकेदारावर मेहरबानी; पण पुणेकरांना बसतोय फटका

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पावसाळी गटारी आणि चेंबरची वारंवार स्वच्छता केली जाईल, अशी घोषणा महापालिकेने (PMC) केली होती. पण, ती केवळ घोषणाच राहिली. कारण पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा चेंबरच्या झाकणावर अडकत असून, पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे शहरात पाणी तुंबत असल्याचे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे स्पष्ट झाले. अधिकारी ठेकेदारावर मेहेरबानी दाखवत असल्याचा फटका पुणेकरांना बसत आहे.

महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि पावसाळी गटारी व चेंबरची स्वच्छता केली जाते. यासाठी दोन्ही कामांसाठी १५ क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र टेंडर काढल्या जातात. यंदा १८० किलोमीटर लांबीचे नाले आणि २६० किलोमीटरची पावसाळी गटारी, ५८ हजार ८५९ चेंबरची स्वच्छता करण्यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च केले आहेत.

नाले सफाई आणि गटारींची स्वच्छता करताना कचरा बाहेर काढणे, पाणी वाहून जाण्यास अडथळा होणार नाही, याची काळजी घेणे अशी कामे केली जातात. पण, पावसामध्ये रस्त्यावरील कचरा वाहून आल्यानंतर तो चेंबरच्या झाकणावर अडकतो. त्यामुळे पाणी चेंबरमध्ये न जाता रस्त्यावर तुंबते. त्याचा फटका नागरिकांना बसतो. गेल्या काही वर्षांपासून हा अनुभव वारंवार येत आहे.

यंदाही पावसाळी गटारींची स्वच्छता एकदा नाही, तर वारंवार केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. जुलैमध्ये सलग मुसळधार पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाणी तुंबले नाही. पण ऑगस्टच्या शेवटी व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी चेंबरमध्ये कचरा अडकल्याने पाणी तुंबत असल्याचे स्पष्ट झाले.

कामाची मुदत सहा महिने; पण...

गटारींच्या स्वच्छतेच्या कामाची मुदत सहा महिने, तर काही वेळा एका वर्षाची असते. त्यामुळे ठेकेदाराने वारंवार स्वच्छता करणे अनिवार्य आहे. परंतु, ठेकेदाराकडून केवळ पावसाळ्यापूर्वी एकदाच स्वच्छता केली जाते.

गेल्या आठवड्यात पाणी तुंबल्यानंतरही चेंबरच्या झाकणावरील कचरा काढण्याचे काम सुरू झालेले नाही. हे काम संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून करून घेणे आवश्‍यक आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

गेल्या दोन वर्षांत ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने पाणी तुंबल्याचा अनुभव आला आहे. यातून धडा घेत प्रशासनाने गटारे व चेंबरची स्वच्छता न केल्यास यंदाही पुन्हा त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून ही कामे पुन्हा एकदा करून घेणे आवश्‍यक आहे.

- अविनाश खंडारे, नागरिक

पावसाळी गटारी, चेंबरची स्वच्छता करणे आवश्‍यक आहे. ही कामे होत नसतील, तर स्वच्छता करण्याचे आदेश देऊन यात सुधारणा केली जाईल. पावसाचे पाणी तुंबणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

नाल्यांची लांबी : १८० किलोमीटर

पावसाळी गटारींची लांबी : २६० किलोमीटर

चेंबरची संख्या : ५८,८५९

स्वच्छतेसाठीचा खर्च : सुमारे २० कोटी