Pune Airport Tendernama
पुणे

Pune: आता लोहगाव विमानतळाचा 'हा' रस्ता होणार सुसाट! 12 कोटीतून...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : लोहगाव विमानतळ (Lohegaon Airport) धावपट्टी वाढविण्यापूर्वी लोहगावला ये-जा करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या पर्यायी रस्त्याचा आराखडा तयार करण्याचे काम पुणे महापालिकेने (PMC) पूर्ण केले आहे. या आराखड्यास संरक्षण मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.

पुण्यातून आंतररराष्ट्रीय विमानसेवेला प्राधान्य मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून लोहगाव विमानतळाच्या धावपट्टी वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने हवाई दलाचे अधिकारी व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने बैठक, प्रत्यक्ष पाहणी देखील झाली आहे.

याबरोबरच महापालिकेच्या पथ विभाग, मालमत्ता विभागासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोहगावसाठीच्या पर्यायी रस्त्याचे सर्वेक्षण करून त्याचा आराखडा तयार केला आहे. महापालिकेकडून रस्त्याचा आराखडा व त्यासंबंधीचा अहवाल संरक्षण मंत्रालयास पाठविला जाणार आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरु केले जाणार आहे.

विमानतळाच्या धावपट्टीची वाढ करण्यापूर्वी लोहगावला जाणारा पर्यायी रस्ता तयार करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने रस्त्याचा आराखडा महापालिकेने केला आहे. संबंधित आराखडा व अहवाल संरक्षण मंत्रालयात पाठविला जाईल, त्यास मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण केले जाईल. हवाई दलाकडून धावपट्टीवाढीसाठी ३१० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, तर लोहगाव पर्यायी रस्त्यासाठी महापालिका १२ कोटी रुपये खर्च करणार आहेत.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका