PMC, Action Tendernama
पुणे

Pune: चुकीला माफी नाही! समाविष्ट गावांतील कारवाईला PMC देणार गती

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महानगरपालिकेत (PMC) समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अनधिकृत होर्डिंग्स, फ्लेक्‍स मोठ्या प्रमाणात असून, त्यांवरील कारवाईला महापालिका प्रशासनाकडून आता गती देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पुनावळेजवळ रस्त्यावरील होर्डिंग्स कोसळून काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर पुणे महापालिकेनेही अनधिकृत होर्डिंगविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली होती. मागील काही दिवसांपासून कारवाई काही प्रमाणात थंडावली होती, परंतु पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंग्सविरुद्ध कारवाईस सुरू करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.

शहराच्या विविध भागांमध्ये धोकादायक होर्डिंग्स कायम असून पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर असे होर्डिंग्स काढणे आवश्‍यक आहे. याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत १२०० हून अधिक अनधिकृत होर्डिंग्स, फ्लेक्‍सवर कारवाई केली आहे. त्याचबरोबर समाविष्ट गावांमध्येही अनिधकृत होर्डिंग्सवर कारवाई करणे सुरू असून त्याला अधिक गती दिली जाईल.’’

...तरीही बॅनरबाजी थांबेना!
शहरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर पुन्हा एकदा बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची सद्यस्थिती आहे. विविध संघटनांचे मेळावे, सभा, उद्‌घाटन कार्यक्रम, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रमांचे बॅनर सर्रासपणे लावले जात आहेत.