Pune City Tendernama
पुणे

Pune News : पुणे महापालिकेची 'ती' मागणी पूर्ण होणार का? पुणेकरांना दिलासा मिळणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहराची लोकसंख्या वाढत असल्याने तहानदेखील वाढली आहे. त्यामुळे २०२४-२५ या वर्षासाठी २१.४८ टीएमसी (TMC) पाणी कोटा मंजूर करावा, अशी मागणी महापालिकेने (PMC) केली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी २०.९० टीएमसी पाण्याची मागणी करूनही केवळ १२.८२ टीएमसी पाणीकोटा मंजूर केला होता. त्यामुळे यंदा पुणेकरांच्या गरजेनुसार पाणी मिळणार, की पाटबंधारे विभाग हात आखडता घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

पुणे शहराला खडकवासला धरण प्रकल्प, भामा आसखेड धरण, रावेत बंधारा या ठिकाणांवरून पाणीपुरवठा केला जातो. पण शहराचा बहुतांश भाग खडकवासला धरण प्रकल्पावर अवलंबून आहे.

महापालिकेचा पाटबंधारे विभागासोबत झालेल्या करारानुसार १२.४१ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाते. पण शहराची वाढती लोकसंख्या, समाविष्ट झालेली ३४ गावे यामुळे पाण्याची मागणी दरवर्षी वाढत आहे.

राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिकेला दरवर्षी पाटबंधारे विभागाला पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून ते सादर करावे लागते. यामध्ये गेल्या वर्षीच्या लोकसंख्येत सरासरी दोन टक्के वाढ गृहीत धरली जाते. तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांची दोन टक्के वाढलेली लोकसंख्या, पुणे शहरात नोकरी, शिक्षक, व्यवसायासाठी रोज ये-जा करणारे नागरिक यांना गृहीत धरून पुढील वर्षभरात किमान ७९ लाख ३९ हजार ९७४ लोकसंख्येला पाणी द्यावे लागणार आहे.

तसेच ३५ टक्के पाणीगळती ग्राह्य धरून महापालिकेने २१.८४ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. २०२३-२४ या वर्षासाठी २०.९० टीएमसी पाण्याची मागणी केली होती.

पण जलसंपदा विभागाने त्याला कात्री लावत केवळ १२.८२ टीएमसी पाणीकोटा मंजूर केला होता. त्यानंतर आता २०२४-२५ या वर्षासाठी २१.४८ टीएमसी पाण्याची मागणी करणारे अंदाजपत्रक आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादर केले आहे.

३४ गावांमधील लोकसंख्या वाढली
पुणे महापालिकेत २०१७मध्ये ११ आणि २०२१मध्ये २३ अशी ३४ गावे समाविष्ट झालेली आहेत. या गावांची ११ लाख १४ हजार ७१४ इतकी लोकसंख्या गृहीत धरून पाण्याची मागणी केली जात होती. पण महापालिकेने केलेल्या सुधारित अभ्यासामध्ये ३४ गावांची लोकसंख्या १८ लाख ११ हजार ३४० असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामध्ये धायरी, नांदोशी, नांदेड, कोंढवे धावडे, आंबेगाव खुर्द, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा-केशवनगर, मांजरी या गावांची लोकसंख्या ८ लाख ३१३ इतकी आहे. येथे बल्क मीटरनुसार प्रतिमाणशी १२० लिटर प्रतिदिन पाणी दिले जाते. तर उर्वरित गावांमध्ये १० लाख ११ हजार २६ लोकसंख्या आहे. या भागांत जलवाहिन्यांचे प्रमाण कमी असल्याने टँकरच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ केल्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे.

अशी आहे पाण्याची मागणी
जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा - ११.१७ टीएमसी
टँकरद्वारे पाणीपुरवठा - ०.१९ टीएमसी
समाविष्ट गावांसाठी - २.१५ टीएमसी
तरल लोकसंख्येसाठी - ०.१७ टीएमसी
व्यावसायिक पाणीवापर - ०.३३ टीएमसी
३५ टक्के पाण्याची गळती - ७.७२ टीएमसी
एकूण - २१.४८ टीएमसी