Balgandharva Rangamandir Tendernama
पुणे

Pune News : अवघ्या 2 महिन्यांपूर्वीचा लाखोंचा खर्च का गेला वाया?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्याने बालगंधर्व रंगमंदिराच्या (Balgandharv Rangamandir) छतावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच, झाडांची पाने व कचरा गेल्यामुळे पाइपमधील पाणीही बाहेर आले होते. त्यामुळे शनिवारी (ता. ८) प्रेक्षागृहात पाण्याची गळती झाल्याचे स्पष्टीकरण नाट्यगृहाचे प्रशासन अधिकारी राजेश कामठे यांनी दिले आहे.

शहरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने बालगंधर्व रंगमंदिरातील नूतनीकरणाच्या कामाचे पितळ उघडे पाडले. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून नाट्यगृहातील देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आली असतानाही पहिल्याच पावसात नाट्यगृहात पाण्याची गळती झाली, तसेच नाट्यगृहाच्या आवारातही पाणी साचले होते.

या पार्श्‍वभूमीवर रविवारी नाट्यगृहाच्या अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या भवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाट्यगृहाची पाहणी केली.

पाऊस खूप प्रमाणात झाल्याचा फटका नाट्यगृहाला बसला. छतावर भरपूर पाणी साचले होते, तसेच पाइपमध्ये कचरा आणि झाडांची पाने गेल्याने पाण्याला वाहून जाण्यासाठी मार्ग उरला नाही. त्यामुळे प्रेक्षागृहातील भिंतीमधून त्या पाण्याची गळती झाली. मात्र, पाऊस कमी झाल्यानंतर लगेचच पाणी थांबले होते.

भवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पाहणी करून उपाययोजना केल्या आहेत. अन्य काही दुरुस्ती आवश्यक असल्यास ती करण्याबाबत भवन विभागाला पत्र दिले जाईल, असे कामठे यांनी स्पष्ट केले.

‘वॉटर प्रूफिंग’चे काय झाले?

प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाण्याची गळती झाल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले असले, तरी बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रेक्षागृहाच्या छताचे वॉटर प्रूफिंग योग्य पद्धतीने झाले नसल्याचे शनिवारच्या पाणी गळतीने समोर आले आहे. प्रशासनाने पावसाच्या प्रमाणावर आणि पाइपमध्ये साचलेल्या कचऱ्यावर दोष ढकलत ‘वॉटर प्रूफिंग’ व्यवस्थित असल्याची सारवासारव केली आहे. मात्र, याबाबत वेळेत योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर प्रत्येक वेळी अधिक प्रमाणात पाऊस झाल्यावर नाट्यगृहात हीच समस्या उद्‍भवत राहील.