Pune Tendernama
पुणे

Pune News : 'त्या' पर्यायी रस्त्याबाबत निर्णय का होईना?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न काही प्रमाणात कमी झाल्याने कृषी महाविद्यालयातील पर्यायी रस्ता सुरू करावा किंवा नाही?, याबाबत प्रशासनापुढे प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका, पीएमआरडीए, पोलिसांच्या वाहतूक शाखेची बैठक होणार असून, त्यामध्ये याबाबत ठोस निर्णय घेतला जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंद ऋषीजी महाराज चौकासह गणेशखिंड रस्त्यावर बहुमजली उड्डाण पूल, मेट्रो प्रकल्प व रस्ता रुंदीकरणामुळे चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी पर्यायी रस्त्याबाबत महापालिका, कृषी महाविद्यालय व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

त्यानुसार, कृषी महाविद्यालयातील रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. साखर संकुल येथील महामेट्रोच्या प्रवेशद्वारापासून कृषी महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत अंडी उबवणी केंद्राजवळील लोहमार्ग पुलाखालून हा पर्यायी रस्ता पुढे जात होता.

त्यानुसार, दोन महिन्यांत ‘पीएमआरडीए’ने रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून हा रस्ता खुला केला जाणार होता. मात्र, खुला केला नाही.

आनंद ऋषीजी महाराज चौकासह गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल केला आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्याचबरोबर बोपोडी व खडकीदरम्यानचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, मुंबई-पुणे महामार्गावरील बोपोडी ते संविधान चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने दोन्ही रस्ते महाराष्ट्र दिनापासून वाहतुकीसाठी खुले केले आहेत.

तसेच खडकी रेल्वे स्थानकाजवळील चिखलवाडी परिसरातील अतिक्रमणे काढून महापालिकेने तेथेही रस्ता रुंदीकरण केले आहे. परिणामी वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कृषी महाविद्यालयातील पर्यायी रस्ता तयार झाला आहे. मात्र गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे या रस्त्याबाबत कृषी महाविद्यालय, वाहतूक पोलिस, महापालिकेशी चर्चा करणार आहोत. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

- राहुल महिवाल, आयुक्त, पीएमआरडीए