hoarding Tendernama
पुणे

Pune News : 'हा' पालखी महामार्ग का बनलाय धोकादायक?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : सासवड व जेजुरी (ता. पुरंदर) येथे बेकायदा होर्डिंगवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, बहुतांश होर्डिंग हे पालखी महामार्ग व इतर प्रमुख महामार्गावर धोकादायक अवस्थेत जैसे थे असेच आहेत. त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? धोकादायक होर्डिंग हटविणार तरी कधी? असा सवाल नागरिकांकडून विचार जात आहे.

पुरंदर तालुक्यातील प्रमुख महामार्ग म्हणून ओळखला जाणारा झेंडेवाडी ते नीरा हा पालखी महामार्ग असून, या महामार्गावर अनेक ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग आहेत. सदर होर्डिंगची अतिशय दुरवस्था झालेली आहे.

सध्या वादळी वाऱ्याचे दिवस असून या होर्डिंगवरचे कापड फाटलेले आहे. ते धोकादायकरीत्या वाऱ्याच्या दिशेने फडफडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने सदर कापड ह फडफडून उडून अनेक वाहनांवर पडल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, केव्हाही एखाद्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनावर हे कापड पडून मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लवकरच श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा या मार्गाने मार्गस्थ होणार आहे, अशा वेळी हे धोकादायक व बेकायदेशीर होर्डिंग स्थानिक प्रशासनाने तातडीने हलविणे गरजेचे आहे.

याबाबत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप म्हणाले की, बेकायदा होर्डिंग हटविणे गरजेचे असून याबाबत तहसीलदार पुरंदर यांच्याशी चर्चा करून कारवाईबाबत सूचना केल्या असल्याचे सांगितले.

सासवड ते जेजुरी पालखी महामार्गादरम्यान खळद ग्रामपंचायतच्या हद्दीत जवळपास २० ते २२ होर्डिंग असून, ते बेकायदेशीर आहेत. याबाबत संबंधित होर्डिंगधारकांशी पत्रव्यवहार केला असून, आठ दिवसांच्या मुदतीत स्वतःहून होर्डिंग हटविण्यास सांगितले आहे. मात्र याला अनेक होर्डिंगधारकांनी प्रतिसाद दिला नसून, एक दोन होर्डिंग धारकांनी स्वतःहून धोकादायक होर्डिंग खाली घेतले आहेत. मात्र इतर धोकादायक होर्डिंग अद्यापही जसेच्या तसे आहेत.

काही होर्डिंगधारकांनी ते काढण्याऐवजी जाहिरातीसाठी संपर्क असे फलक त्यावर लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे होर्डिंगधारकांवर खळद ग्रामपंचायत खरच कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सासवड ते जेजुरी मार्गावरील होर्डिंगबाबत प्रशासनातर्फे ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार केला आहे. अधिक माहितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याशी संपर्क करणार आहे.

- डॉ.अमिता पवार, गटविकास अधिकारी