Pune News पुणे : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पुणे महानगर पालिकेने केलेल्या कामांचा बुरखा फाडला असून, शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने पालिका प्रशासनाने केलेले दावे खोटे ठरले आहेत.
पावसाळ्यापूर्वी केलेले रस्ते पहिल्याच पावसात उखडल्याचे चित्र सिंहगड रस्ता परिसरात दिसत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गेल्या काही दिवसांत महापालिकेकडून सिंहगड रस्ता परिसरात मुख्य रस्त्यासह विविध रस्त्यांचे अस्तरीकरण आणि खड्डे दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, पहिल्याच पावसाने या रस्त्याची चाळण झाली आहे.
हिंगणे, आनंदनगर, माणिक बाग, वडगाव, धायरी इत्यादी भागात खड्डे बुजविणे आणि दुरुस्ती यासह काही रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले होते. पाऊस पडून गेल्यानंतर सर्वच रस्त्यांवरील खडी निघून आली आहे. आनंद विहार कॉलनी येथे नर्सरी जवळ करण्यात आलेला रस्ता उखडलेला आहे, तसेच वरील भागातून पाण्यासोबतच मोठ्या प्रमाणात वाळूदेखील वाहून आल्याने रस्त्याचा दर्जा अतिशय घसरला आहे.
आनंद विहार ते तुकाईनगर हा संपूर्ण सुमारे दोन-अडीच किलोमीटरच्या भागात असलेला रस्ता अशाच पद्धतीने उखडला आहे. सोबतच पाणी साचत असल्याने रस्त्यावर वाहने चालवणे अवघड झालेले आहे.
अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने ऐन गर्दीच्या वेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.