Pune Tendernama
पुणे

Pune News : कोट्यवधी खर्चूनही पुणे तुंबल्यास जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : पावसाळा तोंडावर आलेला असला तरी अजून, महापालिकेचे (PMC) पावसाळी गटारांच्या स्वच्छतेचे काम अपूर्ण आहे.

सर्वाधिक पाणी तुंबणाऱ्या ठिकाणचे १०० टक्के काम झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी अद्यापि ८४ किलोमीटर लांबीच्या पावसाळी गटारांची आणि १४ हजार चेंबरची स्वच्छता बाकी आहे. अनेक ठिकाणी चेंबरच्या झाकणात अडकलेली माती, कचरा काढण्यात आलेला नसल्याने कामाचा दर्जाही राखलेला नाही. त्यामुळे कोट्यवधींचा करूनही पाणी तुंबल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होणार आहे.

पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये, त्याचा त्वरित निचरा व्हावा, यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार टाकल्या जातात. पण शहरात मोठा पाऊस झाला की रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येऊन वाहतुकीचा खोळंबा होतो. पावसाळी गटारांची, चेंबरची स्वच्छता केल्याचे सांगितले जात असले तरी पाणी साचते. शहरात नुकत्याच झालेल्या वळवाच्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी तळी निर्माण झाल्याचा अनुभव पुणेकरांनी घेतला.

एप्रिल महिन्यात महापालिकेने पावसाळी गटार, चेंबरच्या स्वच्छतेचे काम सुरू केले. त्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर प्रत्येकी एक निविदा काढण्यात आली आहे.

अशी आहे स्वच्छतेची पद्धत

- प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी एका ठेकेदाराकडे

- पावसाळी गटारींच्या स्वच्छता करताना चेंबरचे झाकण काढून, त्यात अडकलेली माती, खडे, कागद, प्लॅस्टिकचा कचरा काढून टाकला जातो

- ठेकेदाराकडून केवळ पावसाळी गटाराच्या पाइपच्या तोंडावरील माती, कचरा काढला जातो, आतील कचरा काढला जात नाही. त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवावे लागते

- ठेकेदार व्यवस्थित काम करत आहे, की नाही, हे तपासण्यासाठी टँकरने पाइपमध्ये पाणी टाकले जाते किंवा एका

- चेंबरमधून बॅटरीचा प्रकाश टाकला जातो व दुसऱ्या चेंबरमध्ये आरसा पकडला जातो

- विनाअडथळा प्रकाश पोहोचला तरच व्यवस्थित स्वच्छता झाल्याचे समजते

- महापालिकेचे अधिकारी या प्रत्येक ठिकाणी तपासणी करतातच असे नाही

मध्यंतरी दोन-तीन वेळा पाऊस पडल्याने सिमेंटच्या झाकणांना अडकून राहिलेला कचरा काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात जाळीवरील कचरा रोज काढावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. गटारातील केबल काढून टाकल्या जात आहे. ठेकेदारांनी व्यवस्थित काम केले नाही, तर उपअभियंत्यांवर कारवाई करणार आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील.

- दिनकर गोजारे, अधिक्षक अभियंता, मलनि:सारण विभाग