pune Tendernama
पुणे

Pune News : मुंढवा चौकातील कोंडी फोडणारा रस्ता मोकळा कधी होणार?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : महाराज सयाजीराजे गायकवाड चौक ते सैनिकनगर सोसायटी दरम्यान बॉटल नेक तयार झाले आहे. या ठिकाणी रस्ता १७५ मीटरपर्यंत ११ मीटर रूंद आहे. हा एचसीएमटीआर अंतर्गत (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट) वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठीच रस्ता अरुंद असल्यामुळे तो वाहनांना अडथळा ठरत आहे. त्याचा परिणाम चौकातील वाहनांवर होत आहे. त्यामुळे येथे रखडलेले रुंदीकरण करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांनी केली.

महाराज सयाजीराजे गायकवाड चौक ते सैनिक सोसायटीपर्यंत रस्ता अरुंद आहे. तो मूळ रस्ता १६ मीटरचा आहे. त्यात येथे रस्त्याच्या पश्चिम बाजूला विहिरीचा संरक्षण कठडा आहे. तर रस्त्याच्या पूर्वेला बाभळीचे झाड वाकलेले आहे. त्याला उंच वाहने घासून जातात. झाड कधीही रस्त्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच १७५ मीटर लांबीच्या रस्त्यावर महावितरण कंपनीचे १० फिडर बॉक्स व एक ट्रान्सफॉर्मर आहे. हेही वाहतुकीला अडथळा ठरत आहे. याबाबत वाहतूक विभागाने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबी पालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

कल्याणीनगर, कोरेगाव पार्क ते मगरपट्टा मुंढवा ते घोरपडी तसेच हडपसर रेल्वे स्टेशन हे पाच रस्ते या चौकात एकत्र येतात. या सर्व रस्त्यांवर वाहनांची सारखी वर्दळ असते. चौकात सिग्नल लागला की, सैनिक सोसायटीपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. कोंडी फोडण्यासाठी चौक ते सैनिक सोसायटीदरम्यान १७५ मीटर लांबीचा रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे. पालिकेने गेल्या आठ महिन्यांपासून रुंदीकरणाचा फलक याठिकाणी लावला आहे. परंतु, पालिकेकडून रस्त्याचे रुंदीकरण अद्यापही होत नाही.

मुंढवा येथील महाराज सयाजीराजे गायकवाड चौक ते मगरपट्टा सिटीदरम्यान रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात आला. त्यामुळे कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा येथून मगरपट्टा सिटीकडे तसेच किर्तनेबाग येथील रेल्वे उड्डाणपुलाकडून घोरपडीकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ नेहमी असते. रस्ते मात्र अरुंदच राहिले आहेत. त्यामुळे या चौकात नेहमीच कोंडी होत असते. या चौकाचे कोरेगाव पार्कच्या दिशेने रुंदीकरण व चारही रस्त्यावर चॅंपर मारून रुंदीकरण करण्यात यावे.

- अभिजित लोखंडे, नागरिक

कोरेगाव पार्क, महाराज सयाजीराजे गायकवाड चौक ते भारतफोर्ज कंपनी व मगरपट्टा सिटीच्या मागील बाजूस अत्यंत महत्त्वाचा एचसीएमटीआर अंतर्गत (वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठीचा रस्ता) तयार करण्यात आला. मात्र, त्यासाठी महाराज सयाजीराजे गायकवाड चौक ते सैनिक सोसायटी तसेच जहाँगीर चौकात रुंदीकरण गेल्या सात वर्षापासून करण्यात आले नाही. मात्र, रखडलेल्या रुंदीकरणामुळे वाहनचालकांना वारंवार कोंडीला सामोरे जावे लागते.

- रामेश्वर पाटील, नागरिक

महाराज सयाजीराजे गायकवाड चौक ते सैनिक नगर सोसायटीदरम्यान रखडलेला रस्ता रुंदीकरण विषयी अभियंत्याशी बोलून घेतो.

- अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथ विभाग