Flyover Tendernama
पुणे

Pune News : 50 वर्षांहून अधिक जुन्या 'त्या' धोकादायक पुलाबाबत काय झाला निर्णय?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरातील साधू वासवानी नवीन पुलाचे (Sadhu Vaswani New Bridge) काम लोकसभा निवडणुकीनंतर १५ मे पासून सुरू करण्याचे निश्‍चित झाले आहे. याबरोबरच साधू वासवानी पुलापासून नवीन शासकीय विश्रामगृहापर्यंतचे रस्ता रुंदीकरणही करण्यात येणार आहे. महापालिका (PMC) व पुणे पोलिस (Pune Police) यांच्यासह विविध विभागांच्या मंगळवारी (ता. २३) झालेल्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला.

साधू वासवानी पुलाला ५० हून अधिक वर्षे झाल्याने संबंधित पूल धोकादायक असल्याने हा पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्यासाठी महापालिकेने नियोजनही केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील वर्षी १५ एप्रिलला नवीन पूल बांधण्यासाठी भूमिपूजनही झाले. त्यानंतरही रेल्वे प्रशासन व वाहतूक विभागाकडून परवानगी न मिळाल्याने पुलाचे काम रखडले होते. त्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांची यासंदर्भात नुकतीच बैठक झाली.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, विशेष प्रकल्प विभागाचे अधिक्षक अभिजित डोंबे, कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीमुळे शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती पुण्यात सभेसाठी येणार आहेत. त्यावेळी वाहतुकीमध्ये बदल केल्यास वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे साधू वासवानी पुलाचे काम १५ मे पासून सुरू करण्यात येईल.

साधू वासवानी पुलावरून उतरल्यानंतर बंडगार्डन वाहतूक शाखा पोलिस चौकी, नवीन शासकीय विश्रामगृहापर्यंतचा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना म्हणून तेथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो पोलिस प्रशासनाकडे द्यावा, याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली.

रेल्वेकडून मिळाली परवानगी

महापालिका प्रशासनाच्या विशेष प्रकल्प विभागाकडून साधू वासवानी पूल पाडण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी रेल्वे प्रशासनाला अनेकदा पत्र पाठविण्यात आले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. काही दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनाकडून पूल पाडण्यासाठी महापालिकेला पत्र मिळाले आहे.

साधू वासवानी पुलाचे काम १५ मे पासून सुरू होईल. परंतु, साधू वासवानी पुलापासून ते नवीन शासकीय विश्रामगृहापर्यंतचा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे हा रस्ता मोठा करण्यासाठी प्रस्ताव देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

- रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

साधू वासवानी पुलाबाबत महापालिका, पोलिस, लष्कर, सार्वजनिक बांधकाम अशा विविध विभागांची मंगळवारी बैठक झाली. त्यामध्ये लोकसभा निवडणूक मतदान झाल्यानंतर पुलाचे काम सुरू करण्याचे निश्‍चित झाले आहे.

- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), महापालिका