Pune tendernama
पुणे

Pune News : ठेकेदारांच्या ठेवींबाबत पुणे महापालिकेचा काय आहे वेगळा प्लॅन?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : पुणे महापालिकेच्या (PMC) तिजोरीत बचत झालेली रक्कम, ठेकेदारांची (Contractor) अनामत रक्कम बँकेमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवण्यासाठी स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दोन प्रस्तावांतून एकूण ७०० कोटी रुपयांच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवल्या जाणार आहेत.

पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प साडे अकरा हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा आहे, पण महापालिकेला प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. तरीही महापालिकेने अर्थसंकल्पात ठरविलेल्या खर्चापेक्षा कमी खर्च होतो. त्यातून उत्पन्नाची मोठी रक्कम बचत होते. त्याचप्रमाणे महापालिकेकडून दरवर्षी सुमारे चार हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या टेंडर काढल्या जातात. त्यावेळी ठेकेदारांकडून अनामत रक्कम घेतली जाते.

काम पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम ठेकेदाराला दिली जाते, पण अनेकदा ही रक्कम वेळेत न दिल्याने ठेकेदारांना प्रशासनाकडे खेटे मारावे लागतात. ठेकेदारांची ही रक्कम महापालिकेच्या तिजोरीत न ठेवता, ती बँकेत ठेव ठेवली जाते. त्यावर महापालिकेला व्याज मिळते. त्यानुसार ४९० कोटी आणि २१० कोटी असे एकूण ७०० कोटी रकमेची ठेव करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे.