stamps & registration Tendernama
पुणे

Pune News : सदनिकांची बनावट नोंदणी करणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : इमारतीमधील सदनिकांची बेकायदेशीरपणे दस्त नोंदणी केल्याप्रकरणी हवेली क्रमांक १५ कार्यालयातील मुद्रांक शुल्क विभागाचे सह दुय्यम निबंधक दोषी आढळल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी राज्य शासनाला पाठवला आहे.

दरम्यान, अशा प्रकारे आणखी प्रकरणे घडली असल्याची शक्यता असल्याने याची चौकशी करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली आहे.

सह दुय्यम निबंधक मानसिंग देशमुख हे हवेली क्रमांक १५ कार्यालय येथे कार्यरत असताना त्यांनी बाणेर येथील एका प्रकल्पात बांधकाम व्यावसायिकाशी संगनमत करून १४ पैकी आठ सदनिकांची बनावट दस्त नोंदणी केली. या प्रकाराबाबत संभूस यांनी एप्रिल २०२४ मध्ये नोंदणी महानिरीक्षक सोनवणे यांच्याकडे तक्रार केली होती. या चौकशीमध्ये देशमुख यांनी नोंदणी अधिनियम १९०८ मधील कलम ३२ व ३४ चा भंग केल्याचे निदर्शनास आले.

नोंदणी महानिरीक्षक सोनवणे यांनी अपर मुख्य सचिव यांना पत्र लिहून देशमुख यांनी मुद्रांक अधिनियमानुसार योग्य मुद्रांकीत कुलमुख्यत्यार पत्राद्वारे दस्तांची नोंदणी करणे आवश्‍यक होते. भागीदारी संस्थेच्या ठरावाच्या पत्राची पडताळणी न करता आठ सदनिकांची नोंदणी करून कर्तव्यात कसूर केला आहे. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी होणे आवश्‍यक आहे.

देशमुख यांनी केलेली चूक गंभीर असून, त्यांचे निलंबन करणे आवश्‍यक आहे, त्यानुसार कारवाई करावी, असे पत्र अपर मुख्य सचिव यांना सोनवणे यांनी केली आहे.

यासंदर्भात संभूस म्हणाले, हवेली १५ येथील कार्यालयात कार्यरत असताना देशमुख यांनी अशा पद्धतीने बनावट दस्त नोंदणी केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करून सखोल चौकशी केली पाहिजे.