File Tendernama
पुणे

Pune News : 'या' रस्त्यावर पोलिसांमुळेच वाहतूक कोंडी; कोणी केला आरोप?

टेंडरनामा ब्युरो

Pune news पुणे : वारजे-माळवाडी पोलिस ठाण्याजवळील रस्ता आधीच अरुंद आहे. अशातच पोलिसांनी गुन्हेगारांकडून जप्त केलेल्या ३० ते ४० दुचाकी व चारचाकी वाहने अनेक महिन्यांपासून या रस्त्याच्या कडेला धुळखात पडून आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना दररोज सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पोलिस प्रशासनाने या वाहनांची लवकरात लवकर वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

या भागातील पॉप्युलर गिरिधर सोसायटी, अतुल नगर, राहुल पार्क, रुणवाल सोसायटी, गार्डन सिटी, ओवेल नेस्ट सोसायटी अशा अनेक सोसायट्यांमधील नागरिक या रस्त्याचा वापर करतात. मात्र या ठाण्याजवळ आल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या वाहनांमुळे या नागरिकांना येथून ये-जा करताना अडचण निर्माण होते.

तसेच ही वाहने अनेक महिन्यांपासून एकाच ठिकाणी उभी असल्याने त्यांच्या खाली कचरा साचलेला आहे. वाहनांच्या खालून कचरा साफ करता येत नसल्याची माहिती कचरा सेवकांनी दिली. त्यामुळे येथे कचऱ्याचा ढीग लागला आहे.

हा रस्ता मुळातच अरुंद असल्याने एकाच वेळी दोन वाहने पास करणे खूप अवघड होत आहे. अशातच कडेला असणाऱ्या वाहनांमुळे रस्ता बऱ्याच प्रमाणात व्यापला गेला आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करणेही कठीण झाले आहे. नागरिकांना बुक्क्यांचा मार सहन करत या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. याला कोणताही पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

येथील धुळखात पडलेली वाहने पोलिसांनी उचलल्यास हा रस्ता मोकळा होईल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटेल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. या ठाण्याजवळ नागरिकांची तसेच येथे असणाऱ्या गॅरेज चालकाचीही अनेक वाहने अस्ताव्यस्त लागलेली असतात. त्यामुळेही अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

वारजे माळवाडी येथील पोलिस ठाण्याजवळील रस्ता हा मुळातच एकेरी वाहतुकीसाठी आहे. तरीसुद्धा येथे दुहेरी वाहतूक होते. याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर एकेरी वाहतुकीचे पालन केल्यास वाहतूक कोंडीची समस्या कमी होऊ शकते. येथे लावलेल्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. या वाहनांची वेगळी व्यवस्था करण्यात यावी. यामुळे येथील कोंडी सुटण्यास मदत होईल.

- शैलेंद्र गायकवाड, स्थानिक नागरिक

येथे मोठ्या प्रमाणात वाहने होती. त्यातील काही वाहने हटविली आहेत. राहिलेल्या वाहनांची कागदपत्रांची पूर्तता करून तसेच कायदेशीर बाबी पूर्ण करून वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारी वाहने हटविण्यात येतील.

- मनोज शेडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वारजे-माळवाडी पोलिस ठाणे