PMC Pune Tendernama
पुणे

Pune News : 'स्वच्छ पुण्या'चा नारा 'असा' होणार बुलंद! लवकरच निघणार टेंडर

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : शहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेकडून ८ कोटी १० लाख रुपयांच्या ८१ घंटागाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्यामुळे लहान रस्ते, गल्लीबोळांमधील कचरा गोळा करणे सोपे जाणार आहे. महापालिकेच्या इस्टिमेट समितीने त्यास मान्यता दिली असून आता टेंडर काढली जाणार आहे.

शहरात रोज २३०० टन ते २४०० टन कचरा निर्माण होतो. घरोघरी निर्माण होणारा कचरा हा स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून कचरा वेचकांकडून संकलित केला जातो. हा कचरा एकत्रित केल्यानंतर तो छोट्या घंटागाड्यांमधून कचरा संकलन केंद्रावर नेला जातो.

मध्यवर्ती भागासह समाविष्ट गावांमध्ये रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी घनकचरा विभागाच्या मोठ्या गाड्या जात नसल्याने कचरा वेळेवर उचलला जात नाही.

समाविष्ट गावात कचऱ्याची समस्या गंभीर होत असल्याने नागरिकांकडून तक्रारीही येत आहेत. या गावांमध्ये कचरा लवकर उचलला जावा यासाठी घनकचरा विभागाकडून घंटा गाड्यांची मोटर वाहन विभागाकडे मागणी करण्यात आली आहे.

या गाड्या खरेदी करण्यासाठी ८ कोटी १० लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले. या पूर्वगणनपत्रकाला इस्टिमेट समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती महापालिकेच्या मोटार वाहन विभागाचे उपायुक्त जयंत भोसेकर यांनी दिली.

सध्या ३७४ घंटागाड्या

कचरा संकलनासाठी महापालिकेकडे स्वतःच्या २७० आणि भाडेतत्वावरच्या १०४ अशा ३७४ घंटागाड्या आहेत. त्यात आणखी ८१ची भर पडणार आहे. तसेच डंपर ५७, मोठ्या घंटागाड्या ७९, बीआरसी ३९, कॉम्पेक्टर ५३, टीपर ५७ या वाहनांचा समावेश आहे. तर भाडेतत्वावरच्या आरएमसी ९३, कॉम्पेक्टर ५६, बीआरसी २५ आहेत.