PMRDA Tendernama
पुणे

Pune News : पीएमआरडीएच्या कंत्राटी कर्मचारी भरतीसाठी लवकरच निघणार टेंडर

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील (PMRDA) चतुर्थ श्रेणीतील २०९ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे, उपलब्ध मनुष्यबळावर प्रशासकीय कामाचा ताण पडत असून बाह्यस्त्रोतामार्फत कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. खासगी संस्थांमार्फत लवकरच कंत्राटी कर्मचारी भरती केली जाणार आहे. त्‍यासाठी प्रशासनाने कार्यवाही देखील सुरू केली आहे.

पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह तीन कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि चार नगरपंचायती यांचा समावेश होतो. तसेच जिल्ह्यातील ८५० गावांचा कारभार पीएमआरडीच्या माध्यमातून हाकला जातो.

पीएमआरडीएशी संबंधित कामकाज करण्यासाठी शेकडो नागरिकांना आकुर्डी येथील मुख्य कार्यालयात यावे लागते. कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असल्यामुळे त्यांचे काम वेळेत होत नाही. त्यामुळे, पीएमआरडीए प्रशासनावर नागरिकांची नाराजी ओढावून घेण्याची वेळ आलेली आहे.

त्या पार्श्वभूमीवर, नागरिकांची प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पीएमआरडीएने कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया हाती घेतली आहे.

लिपीक, शिपाई, टंकलेखक पदांचा समावेश

राज्य सरकारने चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची बाह्यस्त्रोतामार्फत भरती करुन घेण्याचा निर्णय घेतला. त्यावर एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून पीएमआरडीएच्या प्रशासकीय सेवेत चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती झाली होती. लिपिक, शिपाई, टंकलेखक अशा पदांचा त्यामध्ये समावेश आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा निर्धारित कालावधी नुकताच संपुष्टात आला आहे. त्यामुळे, रिक्त होणाऱ्या पदांवर नव्याने कर्मचारी भरती केली जाणार आहे.

बाह्यस्त्रोतामार्फत मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी खासगी संस्थेकडून नव्याने टेंडर मागविण्यात येणार आहेत. सध्या खासगी संस्‍थेची देखील मुदत संपलेली आहे. त्‍यामुळे, ही पदे भरण्यात येणार असल्‍याचे प्रशासनाने सांगितले.

कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कालावधी नुकताच संपुष्टात आला आहे. त्यामुळे, लवकरच बाह्यस्त्रोतामार्फत चतुर्थ श्रेणीतील कंत्राटी कर्मचारी भरती केली जाणार आहे. त्‍याची प्रशासनाने कार्यवाही देखील सुरू केली आहे. राज्य शासनाला तसे कळविले आहे.

- सुनील पांढरे, सहआयुक्त, (प्रशासन), पीएमआरडीए