hoarding Tendernama
पुणे

Pune News : रेल्वे, एसटी महामंडळानेही मोडले नियम; पुणे महापालिका आता काय कारवाई करणार?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : आकाशचिन्ह विभागाच्या नियमावलीचे उल्लंघन करून रेल्वेने (Railway) शहरात ठिकठिकाणी महाकाय होर्डिंग उभे केले आहेत. त्यावर महापालिकेचे (PMC) कोणतेही नियंत्रण नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी रेल्वेच्या होर्डिंगचा अहवाल सादर करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. त्यानंतर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पुण्यात दोन हजार ५९८ अधिकृत होर्डिंग आहेत. त्यामध्ये अनेक ठिकाणी नियमबाह्यपणे काम केले असून, कारवाई झालेली नाही.

अधिकृत होर्डिंगमध्ये नियमबाह्यपणे बदल केल्यास परवाना रद्द करावा व होर्डिंग काढून टाकावे, असा आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून शहरात कारवाई सुरू आहे.

रेल्वे विभागाने आरटीओ चौक, जुना बाजार चौकात मोठे होर्डिंग उभे केले आहेत. जुना बाजार चौकात होर्डिंग कोसळल्यामुळे सिग्नलवर थांबलेल्या नागरिकांना जीव गमवावा लागला. असे असूनही आता तेथे नव्याने होर्डिंग उभे आहेत.

येथे एक मीटरचे अंतर न ठेवता चिकटून १२० बाय २० एवढ्या आकाराचे सांगाडे उभे केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी आयुक्तांकडे केली आहे. बागवे यांच्या पत्रानंतर आयुक्तांनी रेल्वेच्या जागेत उभ्या असलेल्या होर्डिंगची माहिती मागविली आहे.

वाहनचालकांना सिग्नल दिसेना!

जहाँगीर रुग्णालय चौकातून शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत डिजिटल होर्डिंग लावले आहेत. त्याचा प्रकाश वाहनचालकांच्या डोळ्यांवर येत असल्याने सिग्नलचे दिवे दिसण्यास अडथळा येतो. या ठिकाणी नियमावलीचे उल्लंघन होऊनही कारवाई झालेली नाही.

...अशी आहे कायद्यात तरतूद

राज्य शासनाच्या नियमावलीमध्ये रेल्वे, एसटी महामंडळ यांना होर्डिंगसाठी परवानगी नाही; पण त्यांनी ते होर्डिंग उभे करताना त्यांच्या विभागाच्या कामकाजाविषयी माहिती प्रदर्शित करावी. तसेच होर्डिंगवरील जाहिरात रस्त्याच्या बाजूने लावता येणार नाही, ती आतल्या बाजूने असावी असे कायद्यात नमूद केले आहे. प्रत्यक्षात रेल्वे व एसटी महामंडळाच्या जागेतील होर्डिंग रस्त्याच्या बाजूने असून खासगी जाहिराती लावलेल्या आहेत.

रेल्वे कायद्यानुसार आम्ही आमच्या जागेत होर्डिंग उभे करू शकतो. सर्व होर्डिंग सुरक्षित असून, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. महापालिकेकडून आम्हाला कोणतेही पत्र आलेले नाही.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे