Railway Station Tendernama
पुणे

Pune News : पुणे - दौंड मार्गावरील प्रवाशांना रेल्वेने दिली गुड न्यूज! 7 वर्षांनंतर...

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : पुणे-दौंड दरम्यान मेमू (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) धावण्यास सुरुवात झाली आहे. सात वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘मेमू’ या सेक्शनमध्ये धावत आहे.

दौंडचे प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेमू’ रेल्वेची मागणी करीत होते. ती आता काही दिवसांपुरती तरी पूर्ण झाली आहे. पुणे-दौंड दरम्यान नियमितपणे धावणाऱ्या डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) रेक देखभाल व दुरुस्तीसाठी माटुंगा येथे गेला आहे. त्या बदल्यात ‘मेमू’चा रेक धावत आहे.

पुणे ते दौंडदरम्यान विद्युतीकरण झाल्यानंतरही डिझेलवर धावणारी ‘डेमू’ धावत आहे. विद्युतीकरण झाल्याने विजेवर धावणाऱ्या ‘मेमू’चा रेक सुरू करावा, अशी मागणी दौंडच्या प्रवासी संघटना करीत होत्या. शिवाय ‘डेमू’च्या तुलनेत ‘मेमू’ला चार डबे जास्त आहेत. त्यामुळे जास्त प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हाच ‘मेमू’चा रेक कायमस्वरूपी राहावा, यासाठी प्रवासी व प्रवासी संघटना आग्रही भूमिका घेण्याची शक्यता आहे.

हा रेक तात्पुरता

पुणे विभागाचा ‘डेमू’चा रेक देखभाल व दुरुस्तीसाठी माटुंगा येथे गेला आहे. १६ जूनपासून तो पुन्हा पुणे विभागाला मिळणार आहे. दरम्यान पुणे- दौंडच्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात ‘मेमू’चा रेक घेतला आहे. माटुंगाहुन ‘डेमू’चा रेक आल्यानंतर ‘मेमू’ पुन्हा भुसावळला देण्याची शक्यता आहे. हा रेक भुसावळला गेला तर पुणे ते दौंड दरम्यान पुन्हा ‘डेमू’ धावण्याची शक्यता आहे.

‘डेमू’चा रेक देखभाल व दुरुस्तीसाठी माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये पाठविला आहे. त्यामुळे ‘मेमू’चा रेक वापरला जात आहे. मात्र हा रेक पुण्यातच राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे.

पुण्याला दिलेला रेक आमचा आहे. आम्ही तो स्पेअर म्हणून दिला आहे. पुण्याला त्यांचा ‘डेमू’चा रेक मिळाल्यावर आम्ही आमचा ‘मेमू’चा रेक परत घेऊ.

- इति पांडे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ.

पुणे-दौंड दरम्यान ‘मेमू’ धावणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, पण ‘मेमू’चा रेक कायमस्वरूपी पुणे विभागाकडे राहणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आवश्यकता भासल्यास ‘रेल रोको’ करण्याचीदेखील आमची तयारी आहे.

- विकास देशपांडे, सचिव, पुणे-दौंड प्रवासी संघ