Indrayani River Tendernama
पुणे

Pune News : प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उलट्या बोंबा; 'त्या' कंपन्यांना का दिला अभय?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : इंद्रायणी नदीपात्रातील प्रदूषणाला नदीशेजारील ग्रामपंचायत जबाबदार असल्‍याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (MPCB) दिली आहे. ग्रामपंचायतीचे घरगुती सांडपाणी नदीत मिसळत असल्‍याने नदी प्रदूषणात भर पडत असल्‍याचा अजब अहवाल दिला आहे. त्‍या बाबत कारवाई करण्याऐवजी केवळ सूचनांचा फार्स प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केला आहे. तर नदी प्रदूषणाचे खापर ग्रामपंचायतीच्‍या माथ्यावर फोडून कंपन्‍यांना मात्र अभय दिल्‍याचे चित्र आहे.

इंद्रायणी नदीपात्र सातत्‍याने प्रदूषित होत आहे. त्‍याबाबत नागरिकांनी तक्रारी देखील केल्‍या आहेत. नागरिकांच्‍या तक्रारीनंतर महिन्‍याभरापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाहणीचा दिखावा केला. महिना लोटूनही नदी प्रदूषित का होत आहे? याचा अहवाल सादर केला जात नव्‍हता. सुरुवातीला पाहणी केल्‍यानंतर कोणत्याही प्रकारचा फेस, जलपर्णी आढळून आली नसल्‍याचे अधिकारी नागरिकांना सांगत होते.

प्रथमदर्शी कोणतेही रासायनिक द्रव्य (केमिकल) देखील मिसळत नसल्‍याचे सांगण्यात आले. मात्र, नदीपात्रात सातत्‍याने प्रदूषित सांडपाणी मिसळत असल्याने पाण्यावर साबणासारखे फेसाचे तवंग निर्माण होत आहेत. मोठे फेस पाण्यावर तरंगत वाहत आहेत.

याबाबत विविध माध्यमांमध्ये आवाज देखील उठविण्यात आला. त्‍यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदीची पाहणी केली. नदीच्या पाण्याचा नमुना घेतला. नमुना तपासल्‍यानंतर नदी पात्रालगत असणाऱ्या घरगुती सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होत असल्‍याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक ग्रामपंचायती सांडपाण्यावर प्रक्रिया करीत नाहीत. त्‍यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. त्‍यामुळे जलपर्णीत वाढ होत आहे. फेस येत आहे. केमिकल कंपन्‍यांचे पाणी मिसळत असते तर जलपर्णी वाढली नसती अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिली. यावर कारवाई करण्याऐवजी केवळ सूचना देण्याचा फार्स अधिकाऱ्यांनी केला आहे. त्‍यामुळे नदी प्रदूषण रोखणार कसे असा प्रश्‍न आहे.

कंपन्‍यांचे सांडपाणी नदीपात्रात

इंद्रायणी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. देहूपासून आळंदीपर्यंत नदीच्‍या दोन्‍ही बाजूला असलेल्‍या केमिकल कंपन्‍यांचे पाणी यामध्ये मिसळत असल्‍याच्‍या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. अनेक कंपन्‍यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी व्‍यवस्‍था म्हणजेच रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला नाही. त्‍या कंपन्‍या हे रासायनिक सांडपाणी थेट नदीपात्रात सोडत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत. त्‍याकडे जाणीवपूर्वक प्रदूषण नियंत्रण महामंडळ दुर्लक्ष करीत असल्‍याचा आरोप नागरिकांचा आहे. तर कंपन्‍यांचे पाणी नदीत मिसळत नसल्‍याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एकाही कंपनीला त्या बाबत नोटीस दिली नसल्‍याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वारकऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात

आषाढी वारीनिमित्त येत्या २८ व २९ जून अनुक्रमे देहू व आळंदीतून जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. यावेळी राज्यभरातून लाखो वारकरी देहू आणि आळंदीमध्ये दाखल होतात. राज्‍य सरकार त्‍यांना विविध सुविधा पुरविण्याचे आश्‍वासन देत आहे. मात्र, इंद्रायणी नदीपात्रात वाढणाऱ्या प्रदूषणामुळे वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळेल का? प्रदूषित सांडपाणी नदीपात्रात सोडले तर; वारकऱ्यांनी स्नान करायचे कसे? असा प्रश्न नागरिक व भाविक उपस्‍थित करीत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पर्यावरण विभाग, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नगरपरिषद यांनी एकत्र कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दर दोन महिन्‍यांनी पाण्याचा नमुना

इंद्रायणी नदी पात्राचे पाणी दूषित होत असल्‍याबाबत स्थानिक नागरिकांकडून तक्रारी केल्‍या जातात. दर दोन महिन्‍यांनी पाण्याचा नमुना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे नागरिक देत आहेत. त्याबाबत कोणतीही सकारात्‍मक कारवाई होताना दिसत नाही.

स्थानिक ग्रामस्थांच्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आदींच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्‍यानुसार पाण्याचा नमुना घेतला होता. यामध्ये घरगुती सांडपाण्यामुळे नदीला फेस येणे, जलपर्णीत वाढ होत असल्‍याचे स्‍पष्ट झाले. त्‍यानुसार नदी पात्रालगत असणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांचे सांडपाणी नदीपात्रात सोडू नये, याबाबत सूचना दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला कुदळवाडी येथील नाल्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते सांडपाणी नदीत सोडू नये, याबाबत कळविले आहे. नदी प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी प्रादेशिक अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक बोलावून स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच कार्यालयाच्या वतीने देखील नदी प्रदूषणावर उपाययोजना करण्यात येत आहे.

- व्ही. व्ही. किल्लेदार, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ पुणे