Narendra Modi Tendernama
पुणे

Pune News : 'Modi 3.0'मुळे वाहन उद्योग सेक्टरला मिळणार गुड न्यूज!

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : मे महिन्यात एकूण तीन लाख ४७ हजार ४९२ प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत विक्रीत चार टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) एका अहवालात दिली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात एकूण तीन लाख ३४ हजार ५३७ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. (Auto Sector)

दुचाकी वाहनांच्या विक्रीतही १०.१ टक्क्यांनी वाढ झाली असून, मे महिन्यात १६ लाख २० हजार ८४ दुचाकींची विक्री झाली. मागील वर्षी याच कालावधीत १४ लाख ७१ हजार ५५० वाहनांची विक्री झाली होती. मे महिन्यात ५५,७६३ तीनचाकी वाहने विकली गेली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील वाहनांच्या तुलनेत त्यात १४.७ टक्क्यांनी वाढ झाली असून, मे २०२३ मद्ये ४८,६१० तीनचाकी वाहनांची विक्री झाली होती.

मे २०२४ मध्ये एकूण २४ लाख ५५ हजार ६३७ वाहनांचे उत्पादन झाले असून, यात प्रवासी वाहने, तीनचाकी, दुचाकी आणि क्वाड्रिसायकल याचा समावेश आहे. मे २०२४ मध्ये झालेली प्रवासी वाहनांची विक्री आतापर्यंतच्या मे महिन्यातील सर्वाधिक विक्री आहे. मात्र, मे २०२३ च्या तुलनेत ३.९ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे, असे ‘सियाम’चे संचालक राजेश मेनन यांनी सांगितले.

प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, दुचाकी आणि तीन चाकी वाहने या सर्व विभागांनी मे २०२३ च्या तुलनेत मे २०२४ मध्ये वाढ नोंदवली आहे. प्रवासी वाहनांमध्ये केवळ किरकोळ वाढ दिसून आली आहे. यंदा सामान्य मॉन्सूनपेक्षा चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आणि नव्या सरकारचा आर्थिक विकासावर सतत भर असल्याने आम्हाला २०२४-२५ मध्ये वाहन उद्योगात स्थिर वाढ अपेक्षित आहे.

- विनोद अग्रवाल,अध्यक्ष, सियाम