Pune City Tendernama
पुणे

Pune News : पुण्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची निवडणूक प्रचारात चर्चाच नाही!

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : राज्यात मुंबईच्या खालोखाल विस्तार असलेल्या पुणे शहराचा विस्तार प्रचंड वेगाने होतो आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येला सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास होण्याची गरज आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात या विकासप्रकल्पांना ना उमेदवारांनी महत्त्व दिले ना मतदारांनी असे चित्र दिसून आले.

पुणे शहर व परिसरात गेल्या काही वर्षांपासून जवळपास एक लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीचे प्रकल्प ‘पाईपलाइन’मध्ये आहेत. हे प्रकल्प मार्गी लागले, तर पुणे जिल्ह्यासह साऱ्या परिसराचा कायापालट होणार आहे. यामुळे राज्याच्या नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत पुणे जिल्ह्याचा वाटा मोलाचा ठरणार आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराला देखील चालना मिळणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र विमानतळ, रिंगरोड अशा बोटावर मोजता येईल, इतक्याच प्रकल्पांचा ओझरता उल्लेख या निवडणुकीत झाला. हे दुर्दैव म्हणावे लागेल.

राज्याच्या राजकारणात तसेच विकासात पुणे जिल्ह्याला आगळे वेगळे स्थान आहे. पुणे जिल्ह्याचा खासदार केवळ पुणे शहर नव्हे, तर आजूबाजूच्या परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे आजपर्यंत अनेकदा पहावयास मिळाले आहे. त्यातून या शहराची राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आहे.

ही परंपरा यापुढे ही राहिली पाहिजे, या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. मात्र, राजकीय पक्ष आणि उमेदवारांबरोबरच मतदारांनीही या महत्त्वाच्या मुद्द्यांना फारसा हात घातला नाही.