Navale Bridge Tendernama
पुणे

Pune News : हॉटस्पॉट नवले पुलावरील अपघातांचे प्रमाण खरेच घटलेय का?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : भरधाव वेगाने वाहने चालविण्यावर झालेली कारवाई असो वा दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे असो आदी कारणांमुळे पुण्यात अपघाताचे प्रमाण घटले नसले तरीही नागरिकांच्या मृत्यूच्या प्रमाणात मात्र घट झाली आहे. (Navale Bridge Accident News)

पुणे शहर व जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अपघातात मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. पुणे आरटीओ व ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’च्या वतीने जिल्हा प्रशासनाला पुण्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा अहवाल सादर केला होता. त्याच्या अंमलबजावणीनंतर हा बदल दिसत आहे.

पुणे आरटीओ प्रशासनाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी पुणे - सोलापूर, पुणे - सातारा व पुणे - अहमदनगर रस्त्याचा सर्व्हे केला. त्यात अपघाताची कारणे, त्यासाठीच्या उपाययोजना आदींबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला होता.

जिल्हा प्रशासनाने तत्काळ केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर भर दिला. परिणामी पुण्यातील काही ठिकाणी अपघातांचे प्रमाण घटले. यात अपघाताचा हॉटस्पॉट ठरलेल्या नवले पुलाचा देखील समावेश आहे.

अपघाताची आकडेवारी

पुणे ग्रामीण

वर्ष.......अपघाताची संख्या........मृत्यू

२०२३........४२३...........२३५

२०२४.........५०७........२२१

पुणे शहर

२०२३.........३०५........१०५

२०२४........३८२..........९२

(ही आकडेवारी जानेवारी ते मार्च दरम्यानची आहे)

वाहनांच्या वेगावर व हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर सातत्याने कारवाई करण्यात आली. तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याने अपघातात मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणात घट झाली आहे.

- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी), पुणे