Railway Track Tendernama
पुणे

Pune News : पिंपरी गावातून पुण्याकडे जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' नव्या पुलामुळे वाचणार...

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : मुंबई - पुणे लोहमार्गावर (Mumbai Pune Railway Road) पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म येथे उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी ठेकेदाराला (Contractor) २४ महिन्यांची मुदत देण्यात आली असून आत्तापर्यंत पुलाचे ३० टक्के काम झाले आहे. या पुलामुळे पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर या भागांतून पुणे-मुंबई महामार्गावर (Pune Mumbai Highway) ये-जा करणे सोईचे होणार आहे.

डेअरी फार्म येथे लोहमार्ग ओलांडण्यासाठी छोटा रस्ता आहे. त्यावर फाटक आहे. रेल्वेगाड्यांच्या वाहतूक चालू असताना फाटक बंद ठेवले जात असल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागत असत. त्यामुळे, पिंपरी गाव परिसरातून महामार्गावर (निगडी-दापोडी रस्त्यावर) विनाअडथळा वाहतूक अशक्य झाले आहे.

शिवाय, मुंबई-पुणे लोहमार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. त्यामुळे, तेथील फाटके बंद करावे लागणार आहेत. नागरिकांच्या सोईसाठी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारणे आवश्यक आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे पिंपरी डेअरी फार्म येथे उड्डाणपुलाची उभारणी केली जात आहे.

उड्डाणुलाची सद्यःस्थिती

पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलासाठी एकूण १० खांब उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी सात खांबांचे काम पिअर कॅपसह पूर्ण झालेले आहे. आठव्या खांबासाठी फुटिंग झाले असून, पिअर कॉलमचे काम सुरू आहे.

नऊ आणि १० क्रमांकाच्या खांबांमधील स्लॅबच्या कामासाठी आवश्यक स्कॅफोल्डींग उभारली आहे. लोखंडी सळई बांधण्याचे काम सुरू आहे. उर्वरित दोन खांब व त्यामधील ४५ मीटर लांबीचा रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाचे अंतिम रेखांकन रेल्वे विभागाकडे मंजुरीसाठी पुन्हा पाठविलेले आहे.

पुलाची लांबी-रुंदी

पुलाचे स्वरूप चार पदरी आहे. मुंबई-पुणे रस्त्यापासून पॉवर हाऊस चौक पिंपरीपर्यंत १३०० मीटर लांबीचा व १८ मीटर रुंदीचा रस्ता करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरातून पिंपरी गावात जाण्यासाठी व पिंपरी गावाकडून पुणे शहरात जाण्यासाठी नागरिकांना विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे. तसेच नागरिकांची वेळ व इंधन वाचणार आहे. सध्या ३० टक्के काम झाले असून पुढील काम प्रगतिपथावर आहे.

महापालिकेने पुलाच्या कामासाठी संरक्षण विभागाकडून ५.९६ एकर जागा ताब्यात घेतली आहे. त्यापोटी २३.८५ कोटी रुपये दिले आहेत. जानेवारी २०२२ मध्ये उड्डाणपुलाच्या रेखांकनास मंजुरी मिळाली असून टेंडर काढले आहे. या कामामुळे पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील नागरिकांचा प्रवास जलद होणार आहे.

- श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

असा होणार पूल...

टेंडर रक्कम ः ५८.५७ कोटी

स्विकृत रक्कम ः ६५.२८ कोटी

कामाचा आदेश ः ३१ मार्च २०२३

कामाची मुदत ः २४ महिने

पुलाची लांबी ः ५६५ मीटर

पुलाची रुंदी ः १७.२० मीटर