Pune  Tendernama
पुणे

Pune News : पुण्यातील 'या' मोठ्या सरकारी रुग्णालयात औषधांचा दुष्काळ?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : राज्यात पावसाअभावी दुष्काळाची स्थिती असतानाच आता ससून रुग्णालयात चक्क औषधांचा दुष्काळ निर्माण झाला आहे. (Medicine Shortage In Pune's Government Hospital)

औषधांचा पुरवठा ना राज्याकडून होतो, ना स्थानिक पातळीवर खरेदी होते. याचा थेट फटका ससून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सामान्य रुग्णांना बसत आहे. रुग्णालयात औषधांचा खडखडाट झाल्याने अगदी शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या ब्लेडपासून ते जीवरक्षक प्रतिजैविकांपर्यंत सर्वकाही रुग्णालयाच्या जवळ असणाऱ्या औषधांच्या दुकानांमधून रुग्णांच्या नातेवाइकांना खरेदी करावे लागत आहे.

ससून रुग्णालयात राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून रुग्ण येतात. खासगी रुग्णालयांत उपचाराची क्षमता नसलेल्या गरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय आशास्थान आहे. याच रुग्णालयात आता औषधसाठ्याने तळ गाठल्याने आपल्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी बाहेरून आवाक्याबाहेर असलेली औषधे खरेदी करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाइकांवर आली आहे. या प्रकरणात ससून रुग्णालय प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोणती औषधे नाहीत?

पॅरासिटेमॉलपासून औषधांच्या खडखडाटाची सुरवात होते. जीवाणूंच्या संसर्गामुळे झालेले आजार, न्यूमोनियावरील प्रभावी प्रतिजैविके, अॅसिटीडी, उलटी, रक्तस्राव थांबविण्याची औषधे, यकृत विकारावरील प्रभावी गोळ्या संपल्या आहेत. शस्त्रक्रियांसाठी लागणारे ब्लेड, डिस्पोजेबल कॅप, कापूस, प्लॅस्टिक अॅप्रन, एक्झामिनेशन ग्लोव्हज्‌, डिस्पोजेबल निडल्स् अशा अत्यावश्यक साहित्याचा साठा संपल्याची यादी तयार करण्यात आली आहे.

त्या आधारावर रुग्णालयात अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य, औषधे, प्रतिजैविकांचा दुष्काळ सध्या पडल्याचा निष्कर्ष निघत असून, येथील डॉक्टरही नाव न घेण्याच्या अटीवर याला दुजोरा देत आहेत.

पर्यायी व्यवस्था काय करतात?

ब्लेडसाठी रुग्णालयात कोणतीही शस्त्रक्रिया थांबविली जात नाही, त्यासाठी पर्यायी ब्लेड वापरून काम भागविण्यावर सध्या भर दिला असल्याचेही काही निवासी डॉक्टरांनी सांगितले. पर्यायी स्वस्तातील औषधे वापरून उपचार करण्याकडे डॉक्टरांचा कल शस्त्रक्रियेसाठी अत्यावश्यक साहित्य आणि औषधे मात्र रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून आणावी लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपण्याच्या मार्गावरील साहित्य

रुग्णांची जखम बांधण्यासाठी अत्यावश्यक बँडेज, रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर वापरत असलेले ग्लोव्हज्‌, सर्जिकल ब्लेड नंबर २० असे साहित्य संपण्याच्या मार्गावर आहे. त्याचा अत्यल्प साठा रुग्णालयात असल्याचेही या यादीत अधोरेखित करण्यात आले आहे.

का पडला औषधांचा दुष्काळ?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये औषधांसह शस्त्रक्रियांसाठी अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा राज्य सरकारकडून होतो. राज्य खरेदी प्राधिकरण टेंडर मागवून औषधे खरेदीची प्रक्रिया करते. सध्या ही प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे राज्याकडून औषधे आणि उपचारासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा विस्कळित झाला आहे.

औषधांशिवाय उपचार थांबू नये, असे वाटते. त्यामुळे उधार-उसनवारी करून सांगितलेली औषधे आणून देतो. बाहेरच्या सरकारी रुग्णालयांतून रुग्णांना येथे पाठविले जाते आणि येथे औषधे नाहीत, अशी अवस्था आहे. पण, यात रुग्णाला बरे वाटणे महत्त्वाचे.

- रुग्णाचे नातेवाईक