Chandani Chowk Tendernama
पुणे

Pune News : बापरे! ठेकेदार मालामाल अन् पादचारी रस्त्यावर; चांदणी चौकात ही भानगड नेमकी काय?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कोट्यवधी रुपये खर्च करून चांदणी चौकात उड्डाण पूल (Chandani Chowk Flyover) बांधला, या उड्डाण पुलाचे उद्‌घाटनही मोठ्या थाटामाटात करण्यात आले. उड्डाण पुलाची कित्येक कामे अपूर्ण असताना उद्‌घाटन घाईघाईने केल्याचा आरोप त्या वेळी झाला होता.

तो आरोप खरा ठरावा अशीच परिस्थिती सध्या चांदणी चौकात दिसून येत आहे. या ठिकाणी उतरणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी मार्गच केला नसल्याने दररोज हजारो प्रवाशांना स्वत:चा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.

चांदणी चौकातून मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या मार्गावर वाहनांना प्रचंड वेग असतो. अवजड वाहनेदेखील याच मार्गावर धावत असतात. या चौकातून सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबईला नियमित जाणारे व येणारे हजारो प्रवासी आहेत.

मुंबईच्या दिशेने आलेले प्रवासी कोथरूडच्या बाजूला उतरल्यावर त्यांना एनडीए, भूगाव, मुळशीकडे जाण्यासाठी किंवा एनडीएकडून कोथरूड, बावधनकडे पायी जाण्यासाठी पादचारी मार्गच बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक प्रवासी स्वत:चा जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडतात.

दहा महिने उलटूनही विचार नाही

उड्डाण पुलाचे उद्‌घाटन होऊन दहा महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापि पादचाऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. चौकातील रस्ता ओलांडण्यासाठी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, अपंग नागरिकांसाठी कोणतीही सोय न केल्याने प्रवाशांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन चौकात तत्काळ पादचारी मार्ग उभा करावा, अशी मागणीदेखील पादचाऱ्यांनी केली आहे.

अधिकाऱ्यांकडून मिळेना प्रतिसाद

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना मंगळवार (ता. ९) आठ ते दहा वेळा संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

तीन किमीसाठी १२० रुपयांची मागणी

महामार्ग ओलांडून विरुद्ध दिशेला जायचे असेल, तर रिक्षा करून दोन ते तीन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. मध्यरात्री चौकात आल्यावर विरुद्ध दिशेला जायचे असेल, तर रिक्षादेखील उपलब्ध नसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना तीन किलोमीटर चालत जावे लागते. तीन किलोमीटर जाण्यासाठी रिक्षाचालक तब्बल १२० रुपये मागतात. मंगळवारी (ता. ९) पाहणी केली असता, महामार्गाच्या दुभाजकावर लोखंडी जाळी बसवण्याचे काम सुरू होते. तर रस्ता ओलांडण्यासाठी जाळीच्या बाजूने प्रवासी चालत होते.

रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी मार्ग नसल्याने दुभाजकावरून जावे लागते. भरधाव वाहनांच्या गर्दीतून स्वत:चा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. लहान मुलं असणाऱ्या महिलांचे खूप हाल होतात. ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी रिक्षा केल्याशिवाय पर्याय राहत नाही. या ठिकाणी तत्काळ पादचारी मार्ग करायला हवा.

- सुप्रिया जाधव, प्रवासी

पादचाऱ्यांच्या सोईसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पादचारी मार्ग (फूट ओव्हर ब्रिज) बांधला जाणार आहे. हे बैठकीत मी सांगितले आहे. तसेच पत्र देखील देणार आहे.

- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री