Moshi Toll Plaza Tendernama
पुणे

पुणे-नाशिक प्रवास महागला; मोशी, चांडोली टोलनाके पुन्हा सुरू

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी व चांडोली येथील दोन्ही टोलनाके गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा सुरू होणार आहेत. याबाबत सुधारित पथकर लागू करण्याबाबतची जाहीर सूचनाही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणा मार्फत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. नवी मुंबईतील एका खासगी कंपनीस टोल वसुलीचे काम दिले आहे.

या दोन्ही टोलनाक्यांची मुदत ८ ऑक्टोबर २०२१ रोजी पूर्ण झाली होती. रस्ता बांधणीचे पूर्ण पैसे वसूल झाल्याने आयआरबी कंपनीने टोलनाका बंद केला होता. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या पिंपरी चिंचवड, मोशी, आळंदी व चाकण भागातील नागरिकांना गेली वर्षभर टोलपासून दिलासा मिळाला होता. ‘आयआरबी’ने ‘वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर महाराष्ट्र राज्य रस्ते महामार्ग विभागाच्यावतीने २००५ मध्ये दोनही टोलनाके चालवण्यास दिले होते. अनेकदा येथे स्थानिकांना हुज्जत घालावी लागते. परिणामी वाहतूक कोंडी होत होती. आता पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. त्यामुळे ‘आयआरबी’ने हे टोल नाके सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केले आहेत.

चांडोलीजवळ गेल्या वर्षभरात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते. टोल बंद केला तरी चाकण, आंबेठाण आणि राजगुरुनगर शहराजवळ वाहतूक कोंडी नियमित होत आहे. आता गुरुवारपासून टोल घेण्यास सुरवात केली जाणार आहे. याबाबतचे सुधारित दर हे एकूण २९.८१ किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या रस्त्यासाठी लागू आहेत. त्यामुळे आता गेली वर्षभर टोलपासून मुक्ती मिळालेल्या वाहनांना पुन्हा टोल भरावा लागणार आहे.

अशी असणार टोलवसुली...
- टोलनाक्यापासून वीस किलोमीटरच्या अंतराच्या आत असणाऱ्या स्थानिक खासगी वाहनांकरिता मासिक पासचा दर ३१५ रुपये
- टोलनाक्यावर पावती घेतल्यानंतर २४ तासांच्या आत परतीचा प्रवास करत असाल; तर २५ टक्के सूट
- एकाच महिन्यात पन्नास किंवा अधिक एकेरी प्रवास केल्यास ३३ टक्के सूट
- कार, जीपसाठी १५ रुपये एकेरी प्रवासासाठी
- बस व ट्रकसाठी ५५ रुपये एकेरी प्रवासासाठी
- अवजड वाहनांसाठी १०५ रुपये एकेरी प्रवासासाठी
- मोशी येथे शुल्क देणाऱ्या वाहनांना चांडोली टोलनाक्यावर शुल्क देण्याची आवश्यकता नाही