Traffic  Tendernama
पुणे

Pune Nashik Road : 'या' 6 किमीच्या मार्गावर का लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मंचरजवळ भोरवाडी-अवसरी-पेठ घाट (ता. आंबेगाव) ते खेड घाट (ता. खेड) या सहा किलोमीटर अंतरात शनिवारी (ता. ९) संध्याकाळी चार वाजता वाहतूक कोंडी सुरू झाली. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील ही कोंडी रविवारी (ता. १०) पहाटे तीन वाजेपर्यंत कायम होती. तसेच कोंडीत सायंकाळी भर पडल्याने वाहनचालक, प्रवासी त्रस्त झाले.

वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त झालेल्या पेठ ग्रामस्थांनी “निवडणूक मतदान होईपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवावे, अन्यथा आंदोलन करू.” असा इशारा देणारे पत्र सरपंच संजय पवळे यांनी दिले आहे. पूर्व बाजूच्या लेन बंद असल्याने पश्चिम बाजूच्या दोन लेन मधून नाशिक व पुण्याच्या दिशेला वाहने ये-जा करतात. दिवाळीची सुट्टी संपल्यामुळे रस्त्यावर तीन पटीने वाहने वाढली आहेत.

रस्ता अपुरा पडत असल्याने पेठ गावातून जाणाऱ्या जुन्या रस्त्याचाही वापर वाहनचालकांनी केला. पण तेथेही कोंडी झाली. यामुळे सरपंच संजय पवळे, माजी सरपंच राम तोडकर, संतोष धुमाळ, शिक्षक सचिन तोडकर यांच्यासह ग्रामस्थांनी कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला.

महिनाभरापासूनच्या कोंडीमुळे प्रवाशांचा संताप

रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने पूर्व बाजूच्या दोन्ही लेन बंद आहेत. त्यामुळे कोंडीच्या समस्येमुळे महिन्याभरापासून प्रवाशी, नागरिक त्रस्त आहेत. सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल तीन ते साडेतीन तास कालावधी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

मंचर पोलिस ठाण्याचे वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार संपतराव कायगुडे यांच्यासह अन्य पोलिस रस्त्यावर उभे होते. पण वाहनचालक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनाही वाहनचालकाच्या रोषाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, शासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेत गुंतल्यामुळे संबंधित ठेकेदाराला वाहतूक कोंडीबाबत कोणीही जाब विचारत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.

लग्नानिमित्त खरेदी करून खेड घाटात रात्री नऊ वाजता आले. वाहतूक कोंडीमुळे गाडी पाऊण तास जागेवर थांबून होती. मंचरला रात्री साडेबारा वाजता पोचले. माझ्यासह चारजण गाडीत होते. पिण्याचे पाणी संपल्यामुळे अस्वस्थ झालो. बाहेर सर्वत्र अंधार होता. शेजारच्या वाहनचालकाला विनंती केल्यानंतर त्यांनी थोडे पाणी दिले.

- गार्गी काळे पाटील

वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांप्रमाणेच पेठ परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही बसला आहे. रात्रभर वाहनांचा आवाज येत असल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. जनजीवन विस्कळित झाले आहे.

- राम तोडकर, माजी सरपंच, पेठ

आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील किमान दहा हजाराहून अधिक मतदार पिंपरी-चिंचवड,भोसरी,पुणे परिसरात राहतात. वाहतूक कोंडी अशीच कायम राहिल्यास बुधवारी (ता.२०) होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदानावर परिणाम होईल.याकामी प्रशासनाने लक्ष द्यावे. मतदान होईपर्यंत रस्त्याचे काम थांबवावे. चारही लेन सुरु कराव्यात. अन्यथा सातगाव पठार भागातील जनतेला आंदोलन करावे लागेल.

- संजय पवळे, सरपंच, पेठ.

पेठ ग्रामस्थांचे वाहतूक कोंडीबाबतचे निवेदन प्राप्त झाले आहे.पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारासोबत सोमवारी (ता.११) चर्चा करून वाहतूक कोंडीची समस्या निवारण करण्यासाठी कार्यवाही केली जाईल.

- गोविंद शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी मंचर