पुणे (Pune) : राजगुरुनगर (ता. खेड) शहराच्या पूर्वेकडून तयार होत असलेले बाह्यवळण या महिनाअखेर पूर्ण होत आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune - Nashik Highway) वाहतूक कोंडीतून प्रवाशांची आता कायमची सुटका होणार आहे, अशी माहिती पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिली. Rajgurunagar Khed Bypass
बाह्यवळणाच्या कामाच्या चांडोली टोल नाक्यापासून सुरू होणाऱ्या ‘ग्रेड सेपरेटर’ भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, याची पाहणी मेदगे यांनी नुकतीच केली. यावेळी ठेकेदार कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक उपस्थित होते. बाह्यवळणाची ५ किलोमीटर लांबी, त्यावरील लहान मोठी १० बांधकामे, सेवा रस्ते, डांबरीकरण, विद्युतीकरण आणि वृक्षारोपणाचे काम पूर्णत्वास जात आहे. बाह्यवळणावरील ६०० मीटर लांबीच्या भुयारी ‘ग्रेड सेपरेटर’चे काम ठेकेदाराने वेगाने पूर्ण केले. त्यामुळे या कामामुळे त्या परिसरात होणाऱ्या कोंडीतूनही सुटका होणार आहे.
या मार्गाच्या मध्यभागी साडेपाच मीटर उंचीच्या सहा लेन असलेल्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जुन्या महामार्गावर दोनशे फूट लांब व शंभर फूट रुंद पूल बांधण्यात आला आहे. त्यामुळे राजगुरुनगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाला कोणताही अडथळा येणार नाही. तसेच, पुण्याकडून राजगुरुनगरकडे येणारी वाहने सेवा रस्त्याचा वापर करणार आहेत. या सेवा रस्त्याची रुंदी स्थानिक व्यावसायिकांच्या मागणीनुसार दहा फुटाने वाढविण्यात आली आहे. या सेवा रस्त्याला स्वतंत्र गटार योजना करून देण्यात येणार आहे.
भीमा नदीवर दोनशे मीटर लांबीचे दोन पूल व पाबळ रस्त्याच्या क्रॉसिंगवर साडेचारशे मीटर लांबीचा मोठा पूल बांधण्यात आला आहे. भविष्यातील वाहनांची वाढीव संख्या लक्षात घेऊन सर्व पूल सहापदरी रुंदीचे केले आहेत. वाफगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ६० मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला आहे. चासकमान कालवा, तुकाई मंदिराशेजारील ओढा व टाकळकरवाडी रस्ता या ठिकाणीही पूल बांधण्यात आले आहेत. या रस्त्याचे काम टी अँड टी या कंपनीने मुदतीच्या आतच पूर्ण केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांनी या कामाला गती दिली. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सुवर्णसिंग वाघ व प्रवीण भालेराव यांनी अनेक अडचणींवर मात करून काम जलद गतीने पूर्ण केले.