पुणे (Pune) : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे (Pune - Nashik Highspeed Railway) प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. संरक्षण विभागाने खेड तालुक्यातील या प्रकल्पाच्या कामाला आक्षेप घेतला आहे, त्यामुळे सध्या तेथील काम थांबविण्यात आले आहे.
खेड (Khed) तालुक्यात लष्कराच्या जागेतून प्रकल्प जात असल्याने त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलावा लागला आहे. या भागापूरता सुधारित मार्गाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला सादर केला आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील ५४ गावांचा यात समावेश आहे. पुणे जिल्ह्यात पुणे या पहिल्या स्थानकासह हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या स्थानकांचा समावेश आहे. प्रमुख स्थानकांपैकी चाकण, मंचर तसेच नारायणगाव ही स्थानके कृषी उत्पादन व खासगी मालवाहतूक टर्मिनलसाठी असणार असून, राजगुरुनगर स्थानक हे फक्त प्रवासी रहदारीसाठी असणार आहे.
जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, खेड तालुक्यातील १२ गावांमधील मार्गाचे नव्याने संरेखन केले आहे. या सुधारित मार्गाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला पाठविला आहे. रेल्वेचे अधिकारी अजय जैस्वाल यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातून या प्रकल्पासाठी आतापर्यंत २६ पेक्षा जास्त खरेदीखत करण्यात आले आहेत. पुणे, नगर आणि नाशिकपैकी सर्वाधिक खरेदीखत पुणे जिल्ह्यातच झाली आहेत. आतापर्यंत २० हेक्टरपेक्षा जास्त जागा सहमतीने ताब्यात घेण्यात आली आहे. पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाबाबत मध्यंतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, या प्रकल्पाबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रकल्पासाठीचे भूसंपादन सुरू ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
खेड तालुक्यात लष्कराचे स्फोटक नष्ट करण्याचे केंद्र असून, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला बाधा येत असल्याचा आक्षेप लष्कराने घेतला आहे. संबंधित गावांमधील मोजणी आणि संपादित करण्यात येणाऱ्या जागेचे मूल्यांकनही पूर्ण केले होते. पण लष्कराने आक्षेप घेतल्याने तूर्त तेथील काम थांबविले आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी