पुणे (Pune) : पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग क्र. ११ कायमस्वरूपी रद्द करावा, रद्द केल्याप्रकरणी अधिसूचना राज्यसरकारने त्वरित काढावी, महामार्ग प्रकल्पांना भूसंपादन कायदा १९५५ चा लावण्याऐवजी केंदाचा भूसंपादनाचा २०२३ चासंपूर्ण कायदा लावण्यात यावा, या तरदुतीनुसार सुपीक, बागायती जमिनीत प्रकल्प आखता येत नसताना आखलेला प्रस्ताविक महामार्ग रद्द करावा, अनेक गावांतील जमिनी बागायती असून सुद्धा सातबारा उताऱ्यावर जिरायती शेरा वगळून तो बागायती शेरा करून द्यावा, अशा मागण्यांसाठी जुन्नर तालुक्यातील राजुरी, कोळवाडी, गुंजाळवाडी, तांबेवाडी, जाधववाडी, निमगाव सावा, औरंगपूर आदी गावांतील महामार्गातील बाधित शेतकऱ्यांनी राजुरी येथील संभाजी चौकात नुकतेच साखळी उपोषण केले.
या उपोषणस्थळीप्रसंगी भाजप नेत्या आशा बुचके, दीपक औटी, ग्राहक पंचायतीचे प्रांतसंघटनमंत्री बाळासाहेब औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, वल्लभ शेळके, कोळवाडी गावचे उपसरपंच दिनेश सहाने, एम. डी. घगाळे, जि. के. औटी, लक्ष्मण घंगाळे, दिलीप जाधव, संजय कणसे, कारभारी औटी, प्रतीक जावळे, गणपत गाडगे, दत्तात्रेय हाडवळे, गोरक्ष हाडवळे, रवी हाडवळे, गोविंद हाडवळे, अविनाश हाडवळे, संजय औटी, मोहन नायकवडी आदी शेतकरी उपस्थित होते
औटी म्हणाले, ‘‘या ठिकाणाहून जात असलेल्या महामार्गासाठी ज्या जमिनी जात आहे, त्यासाठी कितीही रक्कम शासनाने दिली, तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, असा प्रखर विरोध केला आहे.’’
दरम्यान, या साखळी उपोषणाला आशा बुचके यांनी भेट देत बाधित शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ देणार नाही, ज्या शेतकऱ्यांचे बागायती सुपीक जमीन गेलेले आहे, ते क्षेत्र वगळले जाईल. तसेच ज्यांचे क्षेत्र बागायती आहे. मात्र, या उताऱ्यावर जिरायती शेरा म्हणून उल्लेख आहे, तो तत्काळ संबंधित खात्याला सांगून आपण कमी करून घेऊ, असे आश्वासन दिले.
‘साखळी उपोषणाचे रूपांतर उपोषणात करू’
पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करा, त्याची अधिसूचना त्वरित राज्य सरकारने काढावी, शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून हा मार्ग रद्द करावा. ठराविक शेतकरी बाधित होत नाही तर, पूर्ण गावे उद्ध्वस्त होत आहेत. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना समांतर अन्य रस्ते असताना या औद्योगिक महामार्गाचा घाट कशासाठी घातला जात आहे.
औद्योगिक महामार्ग सुपीक व बागायती जमिनीतून जात आहे, हजारो एकर बागायती जमिनीचे संपादन होणार आहे. याला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. सरकारने वेळेत दखल घेतली नाही तर, साखळी उपोषणाचे रूपांतर प्राणांतिक उपोषणात करण्यात येणार असल्याने याची सरकारने नोंद घ्यावी, असे बाळासाहेब औटी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी जगायचे कसे ः शेळके
वल्लभ शेळके म्हणाले, ‘‘तालुक्यातील गावांतील शेतकरी अल्पभूधारक असून येथील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे. तसेच यापूर्वीही या परिसरातून राष्ट्रीय महामार्ग कुकडी पाटबंधारे विभागाचा डावा कालवा तर पिंपळगाव जोगे धरणाचा डावा कालवा तसेच या कालव्यांच्या पोट चाऱ्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या आहेत. तसेच येथील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे.
शेती हे उपजीविकेचे साधन बनलेले आहे, त्यातच याच परिसरातून कल्याण-लातुर हा महामार्ग देखील याच ठिकाणाहून जात असल्याने त्याचाही सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे या महामार्गास विरोध आहे.’’