Pune Rain Tendernama
पुणे

Pune: पालिकेचा दावा निघाला फुसका; पहिल्याच पावसाने असे 'धुतले'...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील नाले, चेंबरसफाई केल्याचा तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविल्याचा, रस्ते दुरुस्त केल्याचा महापालिका (PMC) प्रशासनाचा दावा रविवारी झालेल्या पहिल्याच पावसामध्ये फोल ठरला. पावसाचे पाणी जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. खड्डे व खराब रस्त्यांमुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

महापालिका प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून शहरातील नालेसफाईची कामे हाती घेतली होती. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नालेसफाई झाली नसल्याचे चित्र होते. ज्या ठिकाणी नालेसफाई झाल्याचे महापालिकेने सांगितले होते, तेथे नाल्यातून काढलेला गाळ, माती, दगड उचलण्याचे कष्ट घेतले नव्हते. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नालेसफाई झाल्याचे सांगून नागरीकांना तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. ज्या भागात तक्रारी आहेत, त्या सोडविण्याचा प्रयत्न केल्याचा दावा प्रशासनाने केला होता.

वाहने पाण्यात अडकून बंद
शहरात रविवारी सकाळी पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने केलेला दावा खोटा ठरला. अनेक ठिकाणी चेंबर, सांडपाणी, मैलापाणी वाहिन्या तुंबल्यामुळे पाणी जाऊ शकले नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चेंबरमधून रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते जलमय झाले.

कर्वे रस्त्यावर एकीकडे स्मार्ट सिटीचे काम तर दुसरीकडे मेट्रोचे पिलर, दुभाजकांमुळे रस्त्यावरील पाणी जाण्यास जागा न राहिल्याने तेथे पाण्याची तळी साचली होती. त्यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. अनेक वाहने पाण्यामध्ये अडकून बंद पडली.

इथे तुंबले पाणी!
कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालय ते डेक्कन, डेक्कन बसस्थानक, प्रभात रस्ता, सिंहगड रस्त्यावरील गणपती नगर येथील चौक, तर डेक्कन व शनिवार पेठ नदीपात्रातील रस्त्यांवरील चेंबरमधून पाणी बाहेर येऊन रस्ते जलमय झाले. सदाशिव पेठेतील साने गुरुजी नगर, टिळक रस्त्यावरील खजिना विहिरीकडे जाणारा रस्ता, गरवारे प्रशाला, डेक्कन बसस्थानकासह अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या.

त्याचप्रमाणे भांडारकर रस्ता, कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, शंकर शेठ रस्ता, महात्मा फुले पेठ, मार्केट यार्ड, विधी महाविद्यालय रस्ता, भांडारकर रस्ता, जंगली महाराज रस्ता, सदाशिव पेठ, स्वारगेट यांसह शहरातील पेठा, उपनगरांमध्ये विविध ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.

रस्त्यांची दुरुस्तीच नाही
महात्मा फुले पेठेतील रस्ता खोदण्यात आला आहे, मात्र संबंधित रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याचे काम महापालिकेने केले नाही. अशा प्रकारे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवल्याचे, अर्धवट अवस्थेतील खड्डे, कामे, रस्त्यांवर टाकलेला राडारोडा यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी रस्त्यावर चिखल तयार झाल्याने दुचाकी घसरण्याच्या घटनाही रविवारी घडल्या.

नागरिकांनीच केली चेंबर सफाई
नालेसफाई, ड्रेनेज साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्ते पाण्याने भरले होते. डेक्कन परिसर, कर्वे रस्त्यावरील रांका ज्वेलर्सजवळील रस्त्यावर पाणी तुंबले होते. महापालिकेकडून मदत न आल्यामुळे नागरीकांनी स्वतः रस्त्यांवरील चेंबरमधील प्लॅस्टिक, कचरा साफ करून पाण्याला मोकळी वाट करून दिली.

डेक्कन येथील प्रभात कॉर्नर परिसरात आठ वेळा चेंबरची झाकणे बदलण्यात आली, त्यानंतरही नवव्या वेळी चेंबरचे झाकण खराब झाले. चेंबर आणखी उंचावर घेतल्याने पाणी जाण्यास जागा राहिली नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. महापालिकेकडे तक्रार करूनही ते दखल घेत नाहीत.
- गणेश मापारी, सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ

पहिल्या पावसानंतरची स्थिती...
- चेंबरची झाकणे निकृष्ट, ड्रेनेज व नालेसफाईची कामे अर्धवटच
- रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण सर्वाधिक
- रस्ते खोदाईची कामे अर्धवट अवस्थेत
- पाणी तुंबण्याच्या प्रकारांमध्ये वाढ
- काही प्रमाणात वाहतूक कोंडी
- वाहतूक कोंडीचा फटका बसण्याची शक्‍यता
- मेट्रो, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पाणी जाण्यास जागा नाही