Karve Road  Tendernama
पुणे

Pune: कर्वे रोडवरील पार्किंगबाबत पालिका म्हणते हरकत नाही; पण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कर्वे रस्त्यावरील (Karve Road) ‘नो पार्किंग’ बंद करून तेथे पार्किंगची व्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिका (PMC) प्रशासनाकडून पार्किंग देण्यासाठी मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मात्र, वाहतूक पोलिसांचे पत्र अद्याप मिळालेले नाही, पण पार्किंग सुरू करण्यास पोलिसांची हरकत नसेल तर आम्ही परवानगी देऊ, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

मेट्रो व उड्डाणपुलाच्या कामासाठी २०१८ पासून खंडुजीबाबा चौक ते करिष्मा सोसायटी दरम्यानचा संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूने ‘नो पार्किंग’ करण्यात आला आहे. त्याचा परिणाम कर्वे रस्‍त्यावरील व्यवसायावर झाला आहे. मेट्रो व उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने या रस्त्यावरील पार्किंग पूर्ववत करावी, अशी मागणी कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशनने केली आहे. तर महापालिकेने कर्वे रस्त्यावर पार्किंगला परवानगी न दिल्यास त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसे जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस यांनी दिला आहे.

या ठिकाणची मागणी पाहता वाहतूक पोलिसांनी कर्वे रस्त्यावर अंशतः पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामध्ये नऊ ठिकाणांचा समावेश आहे. त्यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठवले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘‘रस्त्यावर पार्किंग करायची की नाही, याचा निर्णय पोलिस घेतात. कर्वे रस्त्यावर पार्किंग सुविधा सुरू करण्यासाठी पोलिसांची तयारी असेल तर आमची काही हरकत नाही. पोलिसांचे पत्र अद्याप प्राप्त झाले नाही. मिळाल्यानंतर त्यावर लगेच कार्यवाही करू.’’

कर्वे रस्त्यावरील व्यापाऱ्यांची दुकाने वर्षांनुवर्षे आहेत. दुकानांसमोरील पार्किंग बंद केल्याने त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच नागरिकांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिका, पोलिसांनी या रस्त्यावर पार्किंग द्यायला हवी. जागा कमी पडत असेल तर उड्डाण पुलाखालील जागेचा वापर मोफत पार्किंगसाठी व्हायला हवा.

- मेधा कुलकर्णी, माजी आमदार