Road Tendernama
पुणे

पुणेकरांनो यंदा पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणारच नाहीत कारण महापालिकेने...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे शास्त्रीय पद्धतीने बुजविण्याची तंबी पुणे महापालिकेकडून ठेकेदारांना दिली असून, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. व्यवस्थित खोदाई करून, डांबर व खडी टाकून रोड रोलरने दबाई करून कडा सील करणे बंधनकारक केले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात डांबरी रस्त्यांना खड्डे पडण्याचे प्रकार घडतात. रस्त्याची चाळण झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडतेच, शिवाय वाहनचालकांचे कंबरडे मोडते. पुणे महापालिकेकडून प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील खड्डे बुजविण्यासाठी रोज शेकडो टन डांबर मिश्रित खडीचा वापर केला जातो. पण थातूरमातूर पद्धतीने डांबर, खडी टाकून, व्यवस्थित दबाई न करता खड्डा बुजविला जातो. निकृष्ट पद्धतीने खड्डे बुजविल्या, त्यावर दबाई न केल्याने खडी व डांबर निघून जाऊन रस्त्याची चाळण होते. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. दरवर्षी पुणेकर अशा खड्ड्यांचा अनुभव घेतात. महापालिकेने खड्डे कसे बुजवावेत याची नियमावली आहे. पण त्यानुसार खड्डे बुजविण्यास वेळ लागतो, शहरातील अनेक रस्त्यांना पडलेले खड्डे गडबडीमध्ये बुजविण्यासाठी या नियमावलीकडे दुर्लक्ष केले जाते. पण अशास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजविल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठते.

पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खड्डे बुजविण्याचे काम हे शास्त्रीय पद्धतीनेच झाले पाहिजे असे बजावले आहे. त्यासाठी गेल्या महिन्याभरापासून पथ विभागाच्या वारंवार बैठका झाल्या असून, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच ठेकेदारांनी काटेकोरपणे नियमाचे पालन केले पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत. त्यासाठी प्रत्येकाला खड्डे बुजविण्याची कार्यपद्धती समजून सांगण्यात आली आहे.

अशी आहे कार्यपद्धती

- खड्डा पडल्यानंतर तो भाग कटरने चौकोनी किंवा आयताकृती तीन इंच खोदून घ्यावा

- खड्डा तार ब्रशने साफ करून कचरा, खडी बाजूला काढावी

- खड्ड्याच्या एका बाजूकडून इम्युलेशन कोट मारून घेणे

- कोल्ड मिक्स किंवा हॉट मिक्स हे डांबर टाकून घ्यावे

- त्यावर रोडरोलरने व्यवस्थित दबाई करून घ्यावी

- खड्ड्याच्या चारीही बाजू डांबराने सील करून त्यावर चुना टाकावा

रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर शास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजविणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रस्ते चांगले राहतात आणि नागरिकांना त्रास होत नाही. त्यासाठी कार्यपद्धती तयार केली असून अधिकारी व ठेकेदारांनी त्याचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या आठवडाभरात सुमारे ८० खड्डे बजुविण्यात आले आहेत.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग