Pune Traffic Tendernama
पुणे

Pune : येरवड्यातील शास्त्रीनगर चौकामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेचे पाऊल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरच्या सुधारित आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये उड्डाणपुलाच्या कामासाठी विविध पर्यायांचे आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या आठवड्यात पुणे महापालिकेच्या इस्टिमेट कमिटीपुढे त्याचे सादरीकरण होइल. त्यानंतर संबंधित कामाच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

येरवड्यातील शास्त्रीनगर चौकामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने विकास आराखड्याअंतर्गत चौकामध्ये उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन केले होते. मात्र, उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्याच्या ठिकाणापासून काही अंतरावरच आगाखान पॅलेस ही ऐतिहासिक वास्तू असल्याने या कामास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. हे काम मार्गी लावण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’साठी महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणासमोर सादरीकरणही केले होते.

दरम्यान, रस्त्यावरील वाढलेली वाहतूक व अन्य कारणांमुळे संबंधित उड्डाणपुलासाठी नवीन आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. सल्लागारांकडून सर्वंकष विकास आराखड्यानुसार आखणी, वाहतूक सर्वेक्षण, माती परिक्षणाची कामेही केली जात आहेत. आता उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरसाठीचे जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग (जेईडी) तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये आराखड्यांचे पर्याय व अन्य तांत्रिक माहितीचा समावेश आहे. आता संबंधित माहितीचे महापालिकेच्या इस्टिमेट कमिटीपुढे सादरीकरण केले जाणार आहे.

शास्त्रीनगर चौकातील पुलाच्या कामाचे ‘जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग’ तयार झाले आहे. त्यानुसार, आगामी इस्टिमेट कमिटीपुढे उड्डाणपुलाच्या कामासंबंधीचे विविध पर्यायी आराखड्यांचे सादरीकरण होईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.

- अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, पुणे महापालिका