पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा (Katraj-Kondhwa) रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रकल्प महापालिकेची डोकेदुखी ठरला आहे. रोख स्वरूपात नुकसान भरपाई मागितली जात असल्याने महापालिकेने अखेर या रस्त्याची रुंदीच कमी करण्याचा विचार सुरू केला आहे. जागा ताब्यात येणार नसतील तर पहिल्या टप्प्यात ८४ मीटर ऐवजी ४० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करता येईल का? त्यासाठी किती जागा लागेल याचा सुधारित आराखडा सादर करा, त्यानुसार पुढील निर्णय घेऊ असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
कात्रज-कोंढवा परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने २०१८पासून या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला. सध्या १८ मीटर असलेल्या रस्त्याचे ८४ मीटर रुंदीकरण करण्याचे नियोजन महापालिकेचे आहे. पण जागा ताब्यात येत नसल्याने चार वर्षांत केवळ २८ टक्के काम पूर्ण झाले आहे. अजूनही १ लाख २८ हजार चौरस मीटर इतकी जागा ताब्यात यायची आहे जी जागा ताब्यात आली आहे, ती सलग नसल्याने रुंदीकरणाचे कामही करता येत नाही, अशी स्थिती आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी तब्बल ७५० कोटींचा खर्च येणार आहे. अवघ्या चार किलोमीटरचे काम होत नसल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी (ता. २९) या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी पहिल्या टप्प्या या रस्त्याचे रुंदीकरण ४० मीटर केला तर जागा कमी लागेल, वाहतूक सुरळीत होईल अशी चर्चा झाली आहे. ८४ मीटरऐवजी ४० मीटरचा रस्ता केल्यास भूसंपादनाचा खर्च कमी होईल. त्यामुळे याचा प्रकल्पाच्या सल्लागारास सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य सरकारकडूनही निधीसाठी प्रयत्न
कात्रज-कोंढवा रस्ता ४० मीटर केल्यानंतर किमान मुख्य रस्ता होऊन वाहतूक सुरळीत होईल. पण सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग, सर्व्हिस रस्ते यासह इतर कामांसाठी उर्वरित जागा लागणार आहे. पुढील टप्प्यात ही जागा ताब्यात यावी यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी सरकारकडूनही निधी मिळेल का? यासाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे.