Traffic Jam Tendernama
पुणे

Pune : महापालिकेच्या 'या' निर्णयामुळे कोरेगाव पार्क परिसरातील वाहतूक कोंडी होणार कमी

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कोरेगाव पार्कमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास आता मदत होणार आहे. कोरेगाव पार्कमधील दोन पेट्रोल पंपांजवळील लेन नंबर ७ ते वेस्टीन चौकादरम्यानच्या रस्त्याचे काम पथ विभागाने पूर्ण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल. त्यापुढील पूल व त्याजवळील रुंदीकरणाचेही काम हाती घेण्यात आले आहे.

कोरेगाव पार्क, केशवनगर, मुंढवा या परिसरात विविध कंपन्यांची महत्त्वाची कार्यालये, संस्था, शाळा, महाविद्यालये, उद्योग, व्यवसाय अशा वेगवेगळ्या कारणामुळे रस्त्यावरील गर्दीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे कोरेगाव पार्कमधील लेन नंबर ७ ते वेस्टीन चौक, त्यापुढे वेस्टीन चौक ते कार्निव्हल हॉटेल या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे कोरेगाव पार्क परिसरामधील वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका नागरिकांना बसतो. त्यामुळे महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. या पार्श्‍वभूमीवर, महापालिकेच्या पथ विभागाने रस्ता रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते.

लष्कराच्या जागेसाठी पाठविला प्रस्ताव

लष्कराच्या ताब्यातील उजवीकडील बाजूचे ९०० मीटर व डावीकडील बाजूचे १०० मीटर अशी एक किलोमीटरची जागा महापालिकेला मिळावी. यासंदर्भात महापालिका व लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यानंतर रस्त्यासाठी आवश्‍यक जागा महापालिकेला देण्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये लष्करास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लष्कराकडून हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे, मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही.

कोरेगाव पार्कमधील दोन पेट्रोल पंप ते वेस्टीन चौकापर्यंतचे रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. भैरोबा नाला चौक व त्यापुढील रुंदीकरण राहिले आहे. तसेच कार्निव्हल हॉटेल ते ताडीगुत्ता चौकापर्यंतच्या रुंदीकरणाचेही काम केले जाणार आहे.

- सचिन बागडे, उपअभियंता, पथ विभाग, महापालिका