West Management Tendernama
पुणे

पुणे महापालिकेच्या नाकीनऊ आल्याने कचऱ्यासाठी आता...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करताना महापालिकेच्या नाकीनऊ येत असल्याने आता स्मार्ट पद्धतीने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी संगणक प्रणाली विकसित केली जाणार आहे. पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आणि स्मार्ट सिटी (Smart City) मिळून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यामध्ये शहरातील कचऱ्याचे संकलन, वाहतूक, प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभा केला जाणार आहे. वाहनांसाठी जीपीएस, तर कर्मचाऱ्यांना स्मार्ट वॉच देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी १५ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजुरी दिली.

शहरात दररोज सुमारे २०० टन कचरा तयार होतो. महापालिकेकडून या कचऱ्याचे संकलन, वाहतूक व प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. हा कचरा शास्त्रीय पद्धतीने जिरविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छ संस्थेचे तीन हजार ५०० कर्मचारी आहेत, तर सुमारे सात हजार ५०० कर्मचारी रस्ते झाडण्यासाठी काम करत आहेत. तसेच, सुमारे ७०० लहान-मोठी वाहने कचरा वाहतुकीसाठी वापरली जात आहेत.

महापालिकेची एवढी मोठी यंत्रणा असताना रस्ते झाडण्याचे काम करणारे अनेक कर्मचारी कामावर नसतात, त्यांचे काम करण्यासाठी दुसरे पगारी बोगस कर्मचारी ठेवले आहेत. शिवाय, काहीजण केवळ हजेरी लावून गायब होतात, असे प्रकार शहरात अनेकदा समोर आले आहेत. कचरा संकलन किंवा कचरा वर्गीकरण केंद्रावरही गोंधळाची स्थिती असते. ही स्थिती सुधारण्यासाठी एकत्रित संगणक प्रणाली तयार केली जाणार आहे. त्यासाठी टेंडर मागवून मुंबईतील मे. एस. सी. एस. टेक प्रा. लि. या कंपनीला काम दिले आहेत. यासाठी १५ कोटी ६१ लाख ९६ हजार १०५ रुपये खर्च येणार आहे.

स्मार्ट वॉचवरून कर्मचाऱ्यांवर लक्ष

या प्रणालीअंतर्गत झाडणकाम करणारे, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणारे, घंटागाडी व इतर गाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्मार्ट वॉच दिले जाणार आहे. त्यामुळे ते कामावर केव्हा आले, कोणत्या भागात काम केले, किती वेळ केले याचा हिशोब ठेवता येणार आहे. त्यानुसार त्यांचा पगारदेखील काढला जाईल. वाहनांना जीपीएस लावले जाईल व संकलन केंद्र रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीटीफिकेशनने जोडले जाणार आहेत. या सर्वांवर महापालिकेच्या एलबीटी कार्यालयाच्या इमारतीतील नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाईल.

या संगणकीय प्रणालीची सुरुवात स्मार्ट सिटीचा भाग असलेल्या औंध, बाणेर, बालेवाडी येथून होणार आहे. या भागात ३२ वाहने आणि ९०० कर्मचारी आहेत. महापालिका व स्मार्ट सिटी मिळून हा प्रकल्प करणार आहे.

- अजित देशमुख, उपायुक्त, घनकचरा विभाग, पुणे महापालिका