Pune Tendernama
पुणे

Pune : गणेशखिंड रस्त्याचे होणार रुंदीकरण; जमिन मोजणीचे काम पूर्ण

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक कात्रज येथील मिळकतींची मोजणी मागील महिन्यात झाली. त्यापाठोपाठ आता गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी जमिनीच्या मोजणीचे कामदेखील पूर्ण झाले आहे. ५२ मिळकतींची मोजणी झाली असून या प्रक्रियेचा सविस्तर भूमापन अहवाल भूमी अभिलेख विभागाकडून महापालिकेला सादर केला जाणार आहे.

शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषी महाराज चौकात सध्या दुहेरी उड्डाणपूल व शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. दरम्यान, या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. मेट्रो, उड्डाणपुलाच्या काम एकीकडे सुरू असतानाच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने विकास आराखड्यात असलेल्या गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणाचेही काम हाती घेतले आहे. शिवाजीनगरकडून विद्यापीठाकडे जाताना धोत्रे पथापासून ते महावितरण कार्यालयापर्यंत तसेच विद्यापीठाकडून शिवाजीनगरकडे येताना नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) रिझर्व्ह बॅंकेच्या कृषी महाविद्यालयापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढील रस्ता रुंदीकरणाचे काम विविध तांत्रिक कारणांमुळे अडखळले होते.

दृष्टिक्षेपात

- गणेशखिंड रस्त्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम संचेती रुग्णालयापर्यंत होणार

- रुंदीकरणामध्ये खासगी, सरकारी, निमसरकारी मिळकतींचा समावेश

- या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचा पथ विभाग, मालमत्ता विभाग व हवेली भूमी अभिलेख विभागाकडून जमीन मोजणीचे संयुक्त काम करण्याची प्रक्रिया राहिली होती

- मागील आठवड्यात भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित जमिनीची मोजणी केली

- त्यामध्ये शिवाजीनगरहून विद्यापीठाकडे जातानाच्या रस्त्याच्या बाजूस असलेल्या संचेती रुग्णालय ते आनंदमयी आश्रम या मार्गावरील २७ मिळकती, तर अभियांत्रिकी महाविद्यालय ते महावितरण कार्यालयापर्यंतच्या २५ मिळकतींची मोजणी

- आता सविस्तर भूमापन अहवाल भूमी अभिलेख विभागाकडून महापालिकेला सादर केला जाणार

- या प्रक्रियेमुळे गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणाच्या पुढील कामास आणखी वेग येणार

महापालिकेचा पथ विभाग, मालमत्ता विभाग व भूमी अभिलेख विभाग या तिन्ही विभागांच्या प्रयत्नातून गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्‍यक जमिनीच्या मोजणीचे काम झाले आहे. त्याचा सविस्तर अहवाल आम्हाला लवकरच प्राप्त होईल.

- महेश पाटील, उपायुक्त, मालमत्ता विभाग, पुणे महापालिका

गणेशखिंड रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूच्या मिळकतींच्या मोजणीचे काम करण्यात आले आहे. त्याचा अहवाल लवकरच महापालिका प्रशासनाला दिला जाईल.

- गणेश कराड, नगर भूमापन अधिकारी. भूमी अभिलेख विभाग