Pune City Tendernama
पुणे

Pune Metro : स्वारगेट ते पीसीएमसी या मार्गिकेचा विस्तार निगडीपर्यंत; आता जागा...

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पीसीएमसी (पिंपरी-चिंचवड महापालिका भवन) या मार्गिकेचा विस्तार निगडीतील भक्तीशक्ती चौकापर्यंत केला जाणार आहे. त्यासाठी शहरातील १५ ठिकाणच्या जागा हस्तांतरणाची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे.

पुणे मेट्रोचे दोन मार्ग आहेत. त्यातील स्वारगेट ते पीसीएमसी मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज असा विस्तार करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. निगडीपासून शिवाजीनगरपर्यंत उन्नत (एलिव्हेटेड) आणि शिवाजीनगर ते कात्रज भुयारी मार्ग असेल. पीसीएमसी ते निगडीपर्यंतच्या विस्तारासाठी विविध ठिकाणच्या जागांची मागणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने महापालिकेकडे केली होती. त्यानुसार १५ जागा हस्तांतरणाची कार्यवाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केली आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महापालिका यांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

आधी १०, आता १५ जागा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने दापोडी ते पिंपरी (पीसीएमसी) मेट्रो मार्गासाठी १० ठिकाणच्या जागा २०१८ मध्ये दिल्या आहेत. महापालिका सभा ठरावानुसार अटी व शर्तीवर ३० वर्षे कालावधीसाठी महामेट्रोला या जागा दिल्या आहेत. यात पिंपरीतील पाच, वल्लभनगरला दोन, फुगेवाडीत दोन आणि दापोडीतील एका जागेचा समावेश आहे. आता पीसीएमसी भवन ते निगडी मेट्रो मार्गिकेसाठी आकुर्डीतील चार, निगडीतील आठ आणि चिंचवड येथील तीन अशा १५ जागा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला हस्तांतरण करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सरकारकडे अहवाल सादर

महामेट्रोची स्थिरता व वित्तीय व्यवहार्यता, तसेच तिकीटोत्तर उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक जमिनीचा वाणिज्यिक वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका हद्दीतील जमिनी मालकी हक्काने व बिनशर्तीने देण्याची विनंती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने राज्य सरकारकडे केली होती. सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिकेकडून अहवाल मागविला होता. त्यानुसार महापालिकेने नगरविकास विभागाला अहवाल पाठविला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.

अशा आहेत जागा

निगडी बस टर्मिनल येथील सहा, निगडीतील रिकामी जागा व पदपथाची जागा, आकुर्डीतील मौलाना अबुल कलाम आझाद शाळा व पदपथाच्या पाच वेगवेगळ्या जागा मेट्रोला हव्या आहेत. एमआयडीसी आणि खासगी जागा मालकांकडेही जागांसाठी पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेकडे मिळालेल्या जागांवर मेट्रो मार्गिका, स्थानक, स्थानक प्रवेशद्वार, जिना, लिफ्ट उभारण्यात येणार आहेत.

असे आहे नियोजन

- पीसीएमसी स्थानकापासून (संत मदर तेरेसा उड्डाणपूल) निगडीपर्यंत ४.४१ किलोमीटर मेट्रो मार्गाचा विस्तार असेल

- निगडीतील भक्तीशक्ती चौकात पहिला पिलर उभारला

- पिंपरी-निगडी मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी खंडोबा माळ, निगडीतील टिळक आणि भक्ती-शक्ती चौक अशी चार स्थानके असतील

- स्थानक उभारणीसाठी संबंधित ठिकाणच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील पदपथांची जागा मेट्रोला हवी आहे

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. मेट्रोला जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात दोन्ही संस्थांकडून जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. पीसीएमसी ते निगडी मेट्रो मार्गात कोणताही अडथळा नाही.

- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, भूमी-जिंदगी विभाग, महापालिका