Pune Tendernama
पुणे

Pune : फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रीकरण; यासाठी करणार 'एवढी' जागा भूसंपादीत

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महात्मा फुले पेठेतील फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रीकरण करण्यात येणार असून, या कॉरीडॉरसाठी या परिसरातील १० हजार ९४२ चौरस फूट जागा भूसंपादीत केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका जागामालक, भाडेकरू यांच्याशी चर्चा सुरू करणार आहे. योग्य मोबदला देऊन या जागा ताब्यात घेऊन स्मारक उभारणीचे काम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक एकत्र करावे, अशी मागणी होत आहे. त्यासाठी महापालिकेने या भागात एक रस्ताही विकसित केला होता, पण फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक या दोन वास्तू स्वतंत्र आहेत. या दोन्ही वास्तूंच्या आतमध्ये सुमारे दीडशे मीटर अंतरामध्ये अनेक घरे आहेत, त्यामुळे येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लागू शकलेला नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात नुकत्याच घेतलेल्या बैठकीत या आरक्षणासाठी या परिसरातील जागा आरक्षीत केल्या. त्यामुळे स्मारकासाठी भूसंपादन करण्‍याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

५१६ जागामालक

फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाला एकत्रित करण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण केले आहे. यामध्ये १० हजार ९४२ चौरस मीटर जागा संपादित करणे आवश्‍यक आहे. या परिसरात ५१६ जमीनमालक असून, २८६ भाडेकरू आहेत. या सर्वांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तेथील नागरिकांनी या परिसरातच त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. महापालिकेचे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आणि भवन विभागाचे अधिकारी प्राथमिक चर्चा करतील. त्यानंतर महापालिका आयुक्त, शहर अभियंता हेदेखील संवाद साधणार आहेत.

फुले वाड्यास हजारो नागरिकांची भेट

महात्मा फुले वाड्यास दरवर्षी हजारो नागरिक भेट देतात. महात्मा फुले जयंती, सावित्रीबाई फुले यांची जयंती वाड्यामध्ये उत्साहात साजरी केली जाते. या वेळी राज्यभरातून नागरिक येतात. त्याच परिसरात महापालिकेने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारले आहे. हे दोन्ही स्मारक एकमेकांना जोडले जावेत, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे, पण या दोन वास्तू एकत्र करण्यात अडथळा होता. तो आता हटविण्यात आला आहे.

भिडे वाड्याचे टेंडर लवकरच

बुधवार पेठेतील देशातील मुलींची पहिला शाळा असलेल्या भिडे वाड्यातील स्मारकाचा आराखडा अंतिम झाला आहे. त्यासाठी प्रशासनाने ७ कोटी रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले असून, त्यास इस्टिमेट समितीच्या बैठकीत मान्यता दिल्यानंतर टेंडर काढले जाणार आहे. या ठिकाणी पार्किंग आणि तीन मजली स्मारक उभे केले जाईल. यात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटासह विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण केली जाणार आहे, असे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.

राज्य सरकारने महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक एकत्र करण्यासाठी आरक्षणात बदल केला आहे. स्मारकासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असून, येथील रहिवाशांसोबत सामंजस्याने चर्चा केली जाईल. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो मोबदला सर्वांना दिला जाईल.

- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका