PMC Pune Tendernama
पुणे

Pune : पावसाळी गटारांवर महापालिका वर्षाला करते 25 कोटी खर्च पण अर्ध्या तासाच्या पावसाने...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ‘आम्ही धोकादायक ठिकाणांची यादी तयार केली आहे, पावसाळी गटारांची स्वच्छता झाली आहे, पाणी तुंबलेच तर निचरा होण्यासाठी यंत्रणा तैनात आहे,’ असे दावे महापालिका प्रशासन करते, मात्र प्रत्यक्षात शहरात जेमतेम अर्धा-एक तास जरी मुसळधार पाऊस पडला की रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होत आहे. पावसाळी गटारात कचरा व पाणी अडकत आहे, सोसायट्या, बंगल्यांमध्ये पाणी शिरते आहे. महापालिकेने पावसाळी गटार आणि नालेसफाईसाठी वर्षाला सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले आहेत, पण मुसळधार पावसाला सुरवात होतच पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकतो आहे.

शहरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. ऑगस्ट महिना बहुतांश कोरडा गेल्याने हा पाऊस स्वागतार्ह आहे. पण पावसानंतर मदतकार्यासाठी महापालिकेची यंत्रणा कागदावरच अस्तित्वात असल्याने त्याचा फटका पुणेकरांना बसतो आहे. पावसाळ्यापूर्वी सांडपाणी व्यवस्थापन विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयनिहाय पावसाळी गटार, चेंबर आणि नालेसफाईची निविदा महापालिकेने काढली. हे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा करतानाच पावसाळ्यात वेळोवेळी पावसाळी गटारांची, धोकादायक ठिकाणी स्वच्छता केली जाईल, त्यामुळे पाणी तुंबणार नाही असे दावे केले जात होते. मात्र एकदा स्वच्छता केल्यानंतर ठेकेदाराने पावसाळी गटार, चेंबरची झाकणे याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. जुलै महिन्यात पाऊस झाल्यानंतर बहुतांश चेंबरच्या झाकणांवर कचरा, माती अडकली होती, पण ती काढण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रमुख रस्त्यांसह इतर रस्त्यांवर पाणी तुंबत आहे.

काटकोनात वळविले गटार
दोन दिवसांपूर्वी कोथरूडमधील समर्थ पथ भागात प्रथमच पावसाचे पाणी तुंबले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना तेथे पावसाळी गटार काटकोनात वळविण्यात आल्याचे दिसून आले. तसेच पावसाळी गटार व सांडपाणी वाहिन्या खासगी जागेत एकत्र टाकल्याचे दिसून आले. अशा पद्धतीच्या कामामुळे नागरिकांना फटका बसत आहे.

रस्त्यावर पाणी तुंबण्याची कारणे
- रस्त्यावरील कचरा, माती, दगड व्यवस्थित न उचलणे
- कचऱ्यासह माती वाहून आल्याने पावसाळी गटारासह, चेंबर तुंबणे
- सर्वत्र डांबर व सिमेंट काँक्रिट टाकल्याने पाणी जमिनीत मुरत नाही
- नाल्यांमध्ये अतिक्रमण केल्याने रुंदी कमी होणे
- पावसाळी गटारांची क्षमता कमी असणे
- रस्ते समपातळी नसणे, चेंबर उंचावर असल्याने पाणी वाहून जात नाही

पाणी तुंबण्याच्या घटना जास्त होणारा भाग
- कोथरूड डेपो
- धायरी
- सिंहगड रस्ता
- भुयारी मार्ग, आंबेगाव
- खराडी
- विमाननगर
- लोहगाव
- कात्रज कोंढवा रस्ता
- राजस सोसायटी चौक
- स्वामी विवेकानंद चौक, सातारा रस्ता
- महेश सोसायटी चौक, बिबवेवाडी
- रोहन कृत्तिका सोसायटी, सिंहगड रस्ता

पावसामुळे शहरात पाणी तुंबल्याचा प्रकार घडल्यानंतर सर्वच क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या भागातील नाले व पावसाळी गटारांची स्वच्छता करण्यास सांगितले आहे. त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणाही सतर्क आहे.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका