Pune Tendernama
पुणे

Pune : तीन घाटांमुळे मुळा-मुठेचा संगम होणार सुंदर; 23 कोटी खर्च

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेने नदी काठ सुशोभित करण्याचे काम हाती घेतलेले असताना त्या संगमवाडी ते बंडगार्डन यादरम्यान नवे तीन घाट निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळामुठा नदीचा संगम होतो, त्याठिकाणी आकर्षक पद्धतीने घाट तयार केला जाणार आहे. तर बोटकल्ब थेट नदीशी जोडण्यासाठीही सुविधा केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामात याचा समावेश नसल्याने महापालिकेला आणखी २३ कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

महापालिकेने मुळामुठा नदीचा ४४ किलोमीटरचा काठ सुशोभित करण्यासाठी ११ टप्पे निश्चित केले आहेत. त्यासाठी सुमारे पावणेपाच हजार कोटीचा खर्च येणार आहे. त्यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन टप्प्याची पहिली निविदा काढली असून, या टप्प्यासाठी प्रत्यक्ष कामाचे २६५ कोटी व जीएसटी व इतर कर पकडून हा खर्च सुमारे ३०० कोटीवर जात आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बंडगार्डन ते मुंढवादरम्यान ६०४ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. सध्या या दोन्ही ठिकाणचे काम प्राधान्याने सुरू आहे. नदी काठ सुधार प्रकल्प कसा असेल हे नागरिकांना लक्षात यावे, यासाठी बंडगार्डन येथे प्राधान्याने ३०० मीटरचा टप्पा पूर्ण केला आहे.

संगमवाडी ते बंडगार्डन यादरम्यान नागरिकांना नदीजवळ जाण्यासाठी नवे ठिकाण तयार केले जात आहेत. पण, या दरम्यान जेथे घाट अस्तित्वात नाहीत किंवा जे लहान आहेत, अशा ठिकाणी ते मोठे केले जाणार आहेत. यामध्ये सीओईपीचा घाट मोठा केला जाणार आहे. संगमवाडी येथे मुळा व मुठा नदी एकत्र येते. हे संगमाचे ठिकाण सुंदर व्हावे, तेथे नागरिकांना बसण्याची सुविधा असावी, संगमवाडीच्या बाजूने असलेल्या तीरावर नागरिकांचा थेट नदीशी संपर्क यावा, यासाठी हे संगमाचे ठिकाण खासगी बस पार्किंगच्‍या बाजूने विकसित केले जाणार आहे. तर येरवडा येथे गणेश घाट चांगल्या पद्धतीने विकसित केले जाणार आहे. सीओईपी घाटाच्या कामासाठी दोन कोटी, संगम घाटासाठी १३ कोटी तर गणेश घाटासाठी ६ कोटीचा खर्च येणार आहे.

बोट क्लबसाठी स्वतंत्र व्यवस्था

बोट क्लबमधून नदीकडे जाण्यासाठीच्या जागेवर नदी काठ सुधारचे काम करताना रस्ता होणार आहे. त्यामुळे बोटिंग करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्याच्या खालून भुयारी मार्ग तयार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असून, यासाठी २ कोटीचा खर्च केला जाणार आहे.

नदी काठ सुधार प्रकल्पाची वैशिष्ट

- संगमवाडी ते बंडगार्डन दोन्ही काठ मिळून सात किलोमीटरचा टप्पा

- नदीत मैलापाणी येऊ नये यासाठी १६०० मीमी पाइपमधून मैला वाहून नेणार

- गॅबियन भिंत बांधून त्यावर झाडे लावणार

- दोन्ही बाजूने उद्यान, सायकल मार्ग असणार

- बेटिंग व इतर सुविधा असणार

संगमवाडी ते बंडगार्डन येथे तीन घाट व बोट क्लब येथे भुयारी मार्ग केला जाणार आहे, त्यासाठी २३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कामाचा प्रकल्पाच्या डीपीआरमध्ये समावेश नव्हता, पण काम करताना या नव्या जागा विकसित केल्यास नागरिकांना सुविधा मिळू शकणार आहेत.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका