Pune Tendernama
पुणे

Pune : अजितदादांच्या सूचना अन् विद्यापीठाकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या रस्त्याचा प्रश्न निकाली

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्‍यक २१ पैकी १६ जागांचा ताबा महापालिकेला मिळाला आहे. तसेच राज्य व केंद्र सरकारच्या संस्था, बॅंकांच्या जागांबाबत महापालिका प्रशासनाचा पाठपुरावा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः संबंधित संस्थांना सूचना दिल्याने त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गणेशखिंड परिसरातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्‍यता आहे.

विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकाजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. तेथेच बहुमजली उड्डाण पूल होणार आहे. मेट्रो व उड्डाण पुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी मेट्रो, उड्डाण पुलाचे काम आणि रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा नुकताच आढावा घेऊन महापालिकेसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना दिल्या आहेत.

विद्यापीठाकडून रेंजहिल्स कॉर्नर व तेथून शिवाजीनगरकडे येणाऱ्या रस्त्यावरील २१ जागा प्रशासनाला रुंदीकरणासाठी आवश्‍यक आहेत. त्यापैकी १६ जागामालकांनी ताबा दिलेला आहे. उर्वरित जागा शासकीय तंत्रनिकेतन, महावितरण, आरबीआय बॅंक यांच्यासह आणखी दोघांच्या आहेत. आरबीआय बॅंकेकडून जागा देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचा आदेश बांधकाम विभागाला देण्यात आला आहे, तर वाहनचालकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत वाहतूक शाखेला पत्र देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक जागांचा ताबा आम्हाला मिळाला आहे. तीन ते चार जागांचा प्रश्‍न आहे, त्यात काही सरकारी संस्था आहेत. त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यातूनही लवकरच मार्ग निघेल.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

दोन उद्योजक सकारात्मक

रस्ता रुंदीकरणासाठी एका नामवंत उद्योजकाच्या निवासस्थानाची काही, तर दुसऱ्या एका नामवंत उद्योजकाच्या कार्यालयाच्या परिसरातील जागेची गरज होती. त्यानुसार दोन्ही उद्योजकांनी महापालिकेला जागा उपलब्ध करून दिल्याने रुंदीकरणाच्या कामास मदत होणार आहे.