पुणे

सुरक्षारक्षकांसाठी पुणे महापालिकेचे अनावश्यक ‘लाड’!

गंभीर म्हणजे या निविदा मंजूर करताना लाड यांनी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना ४१ लाख रुपयांचे कमिशन दिले

टेंडरनामा ब्युरो

कोरोना काळात सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसला. अनेक नगरपालिका, महापालिकाही त्याला अपवाद नव्हत्या. कोरोनामुळे महसूलाच्या तुलनेत खर्च जास्त असताही काही ठिकाणी अवास्तव खर्च सुरूच होता. त्याचा परिणाम थेट तिजोरीवर झाला. अशाच प्रकारे पुणे महापालिकेची तिजोरीही रिकामी झाली. प्रकरण आहे पुणे महापालिकेतील सुरक्षारक्षकांची भरती प्रक्रियेचे. सत्ताधारी भाजप नेत्यांना दीड हजार सुरक्षारक्षक नेमून त्यावर ३८ कोटी रुपये खर्च करायचे आहेत. मूळात सुरक्षारक्षकांची गरज नसतानाही मुंबईतले भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीसाठी ‘सुरक्षारक्षक’ऐवजी बहुद्देशीय कामगार भरण्याच्या हेतूने निविदा काढल्या आणि या आमदाराचे ‘लाड' पुरवित त्या मंजूरही करण्याचा उद्योग महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. गंभीर म्हणजे या निविदा मंजूर करताना लाड यांनी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना ४१ लाख रुपयांचे कमिशन दिले.

निविदा काढल्यानंतर स्पर्धक कंपन्यांना नको ती कारणे देत कमी दर असूनही अपात्र ठरवण्याचे धाडस केले गेले. काहीही करून लाड यांच्या ‘क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस’ या कंपनीला बिनबोभाट काम देण्याचा अटापिटा भाजप नेत्यांनी केला. हे कामगार कुठे नेमणार, त्याची गरज आहे का, आधीच्या कामगारांचे काय करणार ? अशा एकाही प्रश्नाचे उत्तर निविदा काढण्याची घाई करणाऱ्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडे नाही. कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला. काही महिन्यांपूर्वी तर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी हाताशी पैसे नसल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून दिसून आले. त्यामुळे अत्यावश्यक कामांशिवाय अन्य कोणतीही कामे न करण्याची ताकीद महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पदाधिकारी, विभागप्रमुखांना दिली होती. त्याकडे कानाडोळा करत १ हजार ५८० सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतला; तशी निविदा काढली. त्यासाठी लाड यांच्या कंपनीसह पाच कंत्राटदार सहभागी झाले होते.

निविदा प्रक्रियत सहभागी झालेल्या पाचपैकी दोन कंपन्यांना अपात्र ठरविले गेले. तर तिसऱ्या कंपनीकडे मनुष्यबळाअभावी तर दुसऱ्या कंपनीकडील परवान्याचे नुतनीकरण झाले नसल्याचे कारण देत अपात्र केले. ही कंपनी गेली चार वर्षे महापालिकेला सुरक्षारक्षक पुरवत आहे. याच कंपनीच्या निविदा सर्वात कमी दराच्या होत्या. तरीही, त्याला बाजूला करून लाड यांच्या कंपनीला काम देण्यात आले.
----
‘अर्थ’पूर्ण व्यवहार?
पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांनी आगामी निवडणुकांची तयारी करत, ‘इलेक्शन फंड’ जमवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून लाड यांच्यासह आपल्याच पक्षाच्या आणि मर्जीतील कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची कामे देण्याचा सपाटा लावला आहे. पुणे महापालिकेतील ही निविदा आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि ‘अर्थ’पूर्ण व्यवहाराचा शब्द दिला. त्यानंतरच निविदा मंजूर करण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी दाखविली.
----
निविदेप्रमाणे सहभागी कंपनी
१ ईगल सिक्युरिटी अॅण्ड पर्सनल सर्व्हिसेस
२ सिंग इंटेलिजेन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस
३ किस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस
४ सैनिक इंटलेजिन्स अॅण्ड सिक्युरिटी
५ बी. एस. ए. कॉर्पोरेशन
६- सुमित फॅसिलिटीज
---
निविदेची रक्कम
४१ कोटी ६ लाख