katraj kondhwa road Tendernama
पुणे

Pune : कात्रज-कोंढवा रस्ता आणखी किती जणांचे बळी घेणार?; रस्ता पूर्ण होण्यास...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्याची दुरवस्था आणि रखडलेल्या रुंदीकरणामुळे या परिसरात गेल्या पाच वर्षांमध्ये ५५ मोठे अपघात झाले आहेत. सध्या या रस्त्यावरून तासाभरात सात ते आठ हजार वाहने ये-जा करतात. यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण मोठे असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.

कात्रज ते गोकुळनगर चौकापर्यंत भारती विद्यापीठ हद्द आणि गोकुळनगर चौक ते खडीमशीन चौकांपर्यंत कोंढवा पोलिस ठाण्याची हद्द आहे. दोन्ही पोलिस ठाण्यात अपघातांमध्ये चार वर्षांत २३ जणांच्या मृत्यूंची तर ३८ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. अपघातांची वाढती संख्या, त्यातून होणारे मृत्यू आणि अपंगत्वामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कंटेनरखाली चिरडून युवकाचा मृत्यू

कात्रजकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या कंटेनर व दुचाकीच्या अपघातात शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका युवकाचा मृत्यू झाला. पॅरामाऊंट-इरोस सोसायटीसमोर दुचाकी घसरल्याने कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन युवकाचा जागीच मृत्यू झाला.

कात्रज-कोंढवा रस्त्याबाबत

- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २०१८ मध्ये रस्ता रुंदीकरण कामाचे उद्‍घाटन

- भूसंपादनाअभावी रखडले रस्त्याचे काम

- राज्य सरकारकडून भूसंपादनासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर

- इस्कॉन मंदिर चौकातील भुयारी मार्गाच्या कामाला गती

- महापालिकेकडून ८४ ऐवजी ५० मीटरचा रस्ता मार्च २०२४ अखेरीस पूर्ण करण्याचे आश्वासन

- ५० मीटर रस्ता रुंदीकरणाच्या हिशोबाने अनेक महत्त्वाच्या जागा ताब्यात; एक जागेचे भूसंपादन रखडले

रस्ता पूर्ण होण्यास नोव्हेंबर उजाडण्याचा अंदाज

पुणे महापालिका प्रशासनाने कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम ३० टक्क्यांपर्यंत केले आहे. मात्र, शत्रुंजय मंदिर चौकातील ग्रेड सेप्रेटरच्या कामास वाहतुकीमुळे अडचण येत आहे. त्याचबरोबर पैशांअभावी भूसंपादनास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कात्रज-कोंढवा रस्ता पूर्ण होण्यास नोव्हेंबर उजाडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कात्रज चौक ते उंड्री पिसोळी या साडे तीन किलोमीटरच्या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. अवजड वाहतुकीच्या रस्त्यावर सर्वाधिक ताण असतो. अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या असून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या पार्श्‍वभूमीवर, राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी त्याविरुद्ध आवाज उठविला होता. महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेत कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग येण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

आत्तापर्यंत मालमत्ताधारकांकडून चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) व हस्तांतरणीय विकास हक्काच्या (टीडीआर) मोबदल्यात २५ हजार ७७९ चौरस मीटर जागा आणि रोख पैशांच्या मोबदल्यात एक हजार ७७१ चौरस मीटर जागा महापालिकेला मिळाली आहे. एफएसआय व टीडीआर देण्याच्या अटीवर ७८ हजार ७७१ चौरस मीटर जागा देखील महापालिकेला मिळालेली आहे. महापालिकेने उपलब्ध जागेमध्ये ५० मीटर रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता, त्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेने तडजोडीसाठी १३७ मालमत्ताधारकांना विनंतीपत्र पाठविले आहे. महापालिकेने आत्तापर्यंत काही प्रमाणात रस्त्याचे काम केले आहे. आत्तापर्यंत मालमत्ताधारकांकडून चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) व हस्तांतरणीय विकास हक्काच्या (टीडीआर) मोबदल्यात २५ हजार ७७९ चौरस मीटर जागा आणि रोख पैशांच्या मोबदल्यात एक हजार ७७१ चौरस मीटर जागा महापालिकेला मिळाली आहे. एफएसआय व टीडीआर देण्याच्या अटीवर ७८ हजार ७७१ चौरस मीटर जागा देखील महापालिकेला मिळालेली आहे. महापालिकेने उपलब्ध जागेमध्ये ५० मीटर रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता, त्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेने तडजोडीसाठी १३७ मालमत्ताधारकांना विनंतीपत्र पाठविले आहे. महापालिकेने आत्तापर्यंत काही प्रमाणात रस्त्याचे काम केले आहे.

...म्हणून होऊ शकतो विलंब !
राजस सोसायटी ते एसबीआयपर्यंत नागरिकांची घरे आहेत. त्यांची जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. रहिवाशांना एफएसआय, टीडीआरपेक्षा रोख रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, शत्रुंजय मंदिर चौकातून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याशिवाय गत्यंतर नसल्याने संपूर्ण चौकात खोदाईचे काम करणे शक्‍य होत नाही. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम ऑक्‍टोबरमध्ये पूर्ण होईल, असे स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात वेगवेगळ्या कारणांमुळे कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम पूर्ण होण्यास नोव्हेंबर उजाडण्याची शक्‍यता आहे.

इथे सुरू आहे काम
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शत्रुंजय मंदिर चौक ते एसबीआय बॅंक, शत्रुंजय मंदिर चौकाच्या पलिकडे गगन उन्नती इमारतीजवळ, टिळेकरनगर रस्ता ते भैरोबा नाला येथे ग्रेड सेप्रेटरचे काम सुरू आहे. तेथील सेवा रस्त्याचे काम झाले आहे. ग्रेड सेप्रेटरचे काम पूर्ण होण्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. पॅरामाऊंट सोसायटी, राज सोसायटी येथे सेवा रस्ता झाला आहे. गगन उन्नती ते टिळकनगर रस्ता यामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक ते दीड महिन्यांत ते काम होईल. सध्या सव्वा किलोमीटरच्या रस्त्याचे म्हणजे सुमारे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

‘‘कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिकेने चार महत्त्वाच्या जागांसाठीची अडचण संपली आहे, आता केवळ एका जागेचा प्रश्‍न राहिला आहे. तो देखील लवकरच मार्गी लागेल. रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका