पुणे (Pune) : सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे (पीपीपी) शहरातील हांडेवाडी व महंमदवाडी येथील विकास आराखड्यातील रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ८८ कोटी ८३ लाख रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या असताना नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील विकास आराखड्यातील रस्ते व पूल खासगी सहभागातून विकसित करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील सात विकास आराखड्यातील रस्ते व दोन उड्डाणपुलाची कामे होणार आहेत.
महंमदवाडी येथील सर्व्हे नंबर १६ मधील विकास आराखड्यातील रस्ता २४ मीटर करण्यात येणार आहे. उंड्री सर्व्हे नंबर २०, २२ ,२६ ते हांडेवाडी सर्व्हे नंबर १, २, ६ या दरम्यान २४ मीटर आरपी रस्ता पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ८८ कोटी ८३ लाख रुपये अंदाजे खर्च असून, याबाबतचा प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. संबंधित रस्त्याची कामे झाल्यास नागरिकांचा वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.