Sarasbaug Tendernama
पुणे

Pune : सारसबाग चौपाटी पुनर्विकासाच्या नवीन आराखड्यास महापालिकेकडून चालढकल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सारसबाग चौपाटीच्या पुनर्विकासाच्या नवीन आराखड्यास महापालिका प्रशासनाकडून तत्त्वतः मंजुरी मिळून दहा महिने उलटले, मात्र अजूनही पुनर्विकासाचे काम पुढे सरकलेले नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगत प्रशासनाकडून चौपाटीच्या पुनर्विकासाच्या कामात चालढकलपणा सुरूच आहे.

पुण्यासह बाहेर गावाहून येणाऱ्या पर्यटकांसाठी सारसबाग आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. सुट्ट्यांच्या दिवशी सारसबागमधील तळ्यातील गणपतीचे दर्शन, मुलांना पेशवे उद्यानाची सफर घडविणे आणि त्यानंतर चौपाटीवरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यास पर्यटकांकडून प्राधान्य दिले जाते. याबरोबरच प्रवासी, विद्यार्थी, रात्री उशिरा कामावरून परतणारे नोकरदार यांनाही रात्रीच्या वेळी जेवणासाठी सारसबाग चौपाटी हे ठिकाण हमखास ठरलेले असते. २०१९मध्ये राज्य सरकारने मुंबईतील चौपाटीच्या धर्तीवर सारसबाग चौपाटीला ‘चांगले खाद्यपदार्थ मिळणारे स्वच्छ ठिकाण’ असा खास दर्जा दिला. दरम्यान, सारसबाग चौपाटीवरील अतिक्रमणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दीड वर्षांपूर्वी तेथे कारवाई करून काही गाळ्यांना टाळे ठोकले होते. त्यावेळी सारसबाग चौपाटीच्या पुनर्विकासाचा प्रश्‍न पुढे आला होता.

महापालिकेने सारसबाग चौपाटीच्या पुनर्विकासासाठी वास्तूविशारदांकडून आराखडे मागविले होते. त्यातील एका आराखड्याला मान्यता मिळाली. त्यानंतर अचानक संबंधित आराखड्याचे काम थांबवून पूर्वीच्या आराखड्यात बदल करून डिसेंबर २०२३मध्ये नवीन आराखडा महापालिकेच्या अंदाज समितीने मंजूर केला होता. चौपाटीच्या पुनर्विकासासाठी प्रारंभी आठ कोटी रुपये खर्च येणार होता. आता हा खर्च १८ कोटी ५० लाख रुपयांवर पोचला आहे. मात्र अजूनही चौपाटी पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. ऑगस्ट महिन्यात प्रकल्पाच्या माहितीचे दृकश्राव्य सादरीकरण महापालिका आयुक्तांसमोर केले जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र सादरीकरण किंवा प्रत्यक्ष कामाला अजून सुरवात झालेली नाही. संबंधित कामासाठीची सर्व प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी झालेली आहे, त्यामुळे संबंधित कामाला तांत्रिक अडथळा येण्याचेही कारण नाही. तरीही, आचारसंहितेचे कारण महापालिका प्रशासनाकडून पुढे करण्यात आले आहे.

पुनर्विकास होणाऱ्या चौपाटीची वैशिष्ट्ये

- पुनर्विकासात दोन मजल्यांवर ७८ गाळे काढले जाणार

- तळमजल्यावर ५४, तर पहिल्या मजल्यावर २४ गाळे

- ५४ अधिकृत व्यावसायिकांच्या पुनर्वसनानंतर उर्वरित गाळ्यांचा होणार लिलाव

- आकर्षक रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, ग्राहकांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था

- २०० वाहनांसाठी भूमिगत पार्किंग व्यवस्था

- भूमिगत पार्किंगसाठी दोन्ही बाजूने प्रवेशद्वार

सारसबाग चौपाटी पुनर्विकासाबाबतचा मुद्दा प्रलंबित आहे. सध्या आचारसंहिता सुरू आहे, आचारसंहिता झाल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.

-सोमनाथ बनकर, प्रमुख, अतिक्रमण विभाग, महापालिका.